स्थैर्य, सातारा, दि.२०: ईडमिटसू होंडा इंडिया टॅलेंट 2020 माेटाेक्राॅस अजिंक्यपद स्पर्धेत येथील इक्शन संकेत शानभाग याने सीबीआर 150 वाहन प्रकारातील रेसमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. इक्शनने ही रेस 13 मिनीट 31 सेकंदात पुर्ण केली. शाम सुंदर याने 13 मिनीट 30 सेकंदात रेस पुर्ण करीत प्रथम क्रमांक मिळविला.
मद्रास मोटर्स स्पोर्टस क्लबच्या रेसींग ट्रॅकवर सहा फे-यांत या रेसमधील दूसरा टप्पा आज (रविवार) संपन्न झाला. सुमारे 22. 3 किलोमीटर अंतराची ही रेस होती. या रेसमध्ये 13 ते 18 वयोगटातील स्पर्धक सहभागी झाले होते. रेसमधील शनिवारी झालेल्या पहिल्या टप्प्यात इक्शनला संमिश्र यश लाभले.
आज (रविवार) रेसच्या दूस-या टप्प्यात अकराव्या स्थानी असलेल्या इक्शनने आपल्या ड्रायव्हींगच्या कौशल्याने एक एका लॅपमध्ये आघाडी घेतली. परंतु त्याच्या बरोबरच्या स्पर्धकांनी तगडे आव्हान निर्माण केले होते. अखेरच्या टप्प्यात इक्शनने आघाडी घेत रेसमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. इक्शन येथील ज्येष्ठ क्रीडा संघटक रमेश शानभाग यांचा नातू आहे. त्याच्या यशाबद्दल साता-याच्या क्रीडा क्षेत्रात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या स्पर्धेत तनिका संकेत शानभाग हिने राष्ट्रीय स्तरावरील गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे.