गोंदवलेकर पुण्यतिथी घरीच करा; कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर समाधी मंदिर समितीचे आवाहन


 

स्थैर्य, गोंदवले, दि.२०: श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या 107 व्या पुण्यतिथी महोत्सवादरम्यान भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन यंदाचा सोहळा आपापल्या घरीच साजरा करावा, असे आवाहन समाधी मंदिर समितीने भाविकांना केले आहे. “श्रीं’च्या समाधी मंदिरातील या महिन्यातील पौर्णिमा उत्सव देखील स्थगित करण्यात आला आहे. 

दरवर्षी मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा ते वद्य दशमी या काळात श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा पुण्यतिथी महोत्सव गोंदवले बुद्रुक येथील समाधी मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने मंदिर परिसरात प्रसिद्ध मान्यवरांचे कीर्तन, भजन, गायन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याशिवाय महोत्सव काळात रोज सकाळी श्रींची प्रतिमा व पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा श्रींचा पुण्यतिथी महोत्सव सध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय समाधी मंदिर समितीने घेतला आहे. प्रथेप्रमाणे कोठी पूजनाने येत्या 31 डिसेंबरला या महोत्सवाला सुरवात होणार असून आठ जानेवारीला पहाटे पाच वाजून 55 मिनिटांनी गुलाल-फुलांच्या उधळणीने सांगता होईल.

अखंड नामस्मरण, अखंड पहारा, त्रिकाल पूजा, नित्य व नैमित्तिक उपासना व इतर सेवा येथे वास्तव्यास असणाऱ्या सेवेकरी व कर्मचारी वर्गांकडून पार पडतील. भाविकांना यामध्ये सहभागी होता येणार नाही. मंदिरातील सभामंडपातूनच सकाळी नऊ ते 11 व सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेत भाविकांसाठी दर्शनाची सोय करण्यात येईल. दर्शनानंतर भाविकांना मंदिर परिसरात कुठेही जाण्यास परवानगी नाही. दर्शनासाठी येण्यापूर्वी बाहेरगावच्या भाविकांनी मंदिर कार्यालयात 02165-258292, 7058059842, 9623197485, 7745000326 या क्रमांकांवर संपर्क साधून नोंदणी करणे अनिवार्य आहे. महोत्सव काळात मंदिर परिसरात निवास व प्रसाद व वैद्यकीय सेवेची व्यवस्था होणार नाही. याशिवाय 30 डिसेंबरबरला होणारी पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली असून, नेहमीप्रमाणे समाधी मंदिर समितीच्या वेबसाईटवरून दररोज पहाटे पावणेपाच ते साडेसहा सकाळी दहा ते 11 व संध्याकाळी साडेसात ते सव्वाआठ या वेळेत ऑनलाइन समाधी दर्शन घेता येईल, अशी माहिती विश्वस्तांनी दिली. 

कोरोनाच्या या अभूतपूर्व काळात भाविकांनी मंदिरात नियमांचे पालन करावे. तसेच यंदाच्या “श्रीं’च्या पुण्यतिथी महोत्सव काळात गर्दी टाळून सहकार्य करावे. 

-विश्वस्त, समाधी मंदिर समिती, गोंदवले बुद्रुक


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!