स्व. हिंदुराव यांचे फलटण – पुणे रेल्वेचे स्वप्न रणजितसिंह यांच्याकडून पूर्ण : ना. प्रकाश जावडेकर; फलटण – पुणे रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ


स्थैर्य, फलटण, दि. 30 : माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी बघितलेले फलटण ते पुणे रेल्वेचे स्वप्न त्यांचे पुत्र खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नांमधून आज पूर्ण होत आहे. ही रेल्वे सेवा फलटणमधील विद्यार्थी, युवक, नोकरदार व व्यापारी यांना अल्प दरामध्ये फलटण मधून पुण्याला जाण्यासाठी व पुण्यावरून फलटणला येण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे मत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री ना. प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

फलटण ते पुणे रेल्वेचा शुभारंभ आज केंदीय माहिती व प्रसारण मंत्री ना. प्रकाश जावडेकर यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून संपन्न झाला. या वेळी राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार संजय कांबळे, फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवताना माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मला मिळाले होते. फलटण ते पुणे रेल्वे व्हाव्ही हे त्यांचे पहिल्यापासूनचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न आज त्यांचे सुपुत्र खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नाने पूर्णत्वास गेलेले आहे. आगामी काळामध्ये फलटणवरून इतर ठिकाणी सुद्धा रेल्वे सेवा सुरु होईल अशी आम्हाला खात्री आहे, असेही ना. जावडेकर यांनी स्पष्ट केले.

आपल्या राज्यातील सर्व खासदार हे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी व रेल्वे मंत्री ना.पियुष गोयल यांच्या कामकाजावर कायम खुश असतात. राज्यातील सर्व खासदारांची सर्व विभागातील कामे तत्परतेने दोघेही करतात. गेल्या सात वर्षामध्ये रेल्वेमध्ये अमुलाग्र बदल झालेले आहेत. पूर्वी रेल्वे स्टेशन व त्यावरील टॉयलेट याची अवस्था अत्यंत बिकट स्वरूपाची होती. परंतु गेल्या सात वर्षांमध्ये रेल्वे हि स्वच्छ भारत प्रमाणे सर्व ठिकाणी स्वच्छ दिसत आहे. आधीच्या काळामध्ये रेल्वे तिकीट बुकिंग करताना आयआरसीटीसी प्रणाली व्यवस्थित चालत नव्हती परंतु आता हीच प्रणाली अपडेट करून ती आता उत्कृष्ट रित्या चालत आहे, असेही ना. जावडेकर यांनी यावेळी सांगून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनमधून रेल्वचा संपूर्ण कायापालट झालेला आहे. पूर्वी रेल्वेची प्रगती हि शटल प्रमाणे होत होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनमुळे हीच रेल्वे हि राजधानी एक्सप्रेस प्रमाणे चालत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या प्रगतीशिवाय काहीही सुचत नाही. नरेंद्र मोदी हे 24 तास फक्त आणि फक्त देशाच्या हिताचाच विचार करून कार्यरत असतात, असेही ना. जावडेकर यांनी स्पष्ट केले.

माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या स्वप्नातील फलटण पुणे रेल्वे सेवा आज सुरु होत आहे. स्व. हिंदुराव यांनी कायम फलटणकर जनतेला पुणे – मुंबई येथे जाण्यासाठी रेल्वे सुविधा उपलब्ध करुन द्यावी, यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांचेच स्वप्न त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या आत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पूर्ण केले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रत्येक कामात आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, असे राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगून फलटण ते पुणे हि रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह ज्या रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेत होते त्यांच्या परिश्रमाला आज यश आलेले आहे. फलटण ते पुणे रेल्वेमुळे फलटण मधील सर्वसाधारण घरातील विद्यार्थी व युवकांना अल्प दरात पुणे, मुंबई येथे आता जाता येणार आहे व त्यासोबत येताही येणार आहे. या रेल्वेमुळे फलटण सारख्या ग्रामीण भागातील व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. आगामी काळामध्ये फलटणचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी या रेल्वेचा नक्कीच उपयोग होईल, असेही श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरत आहे, त्या बद्दल आम्हा सर्व कुटुंबियांना मनस्वी आंनद होत आहे. परंतु एक खंत सुद्धा आज वाटत आहे, ती म्हणजे नेते आज आपल्यात असायला हवे होते. त्यांची पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही. स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या बाबतीत ज्या काही विकासाच्या गोष्टींची सुरवात केलेली होती त्या सर्व गोष्टी आगामी काळामध्ये पूर्णत्वास जातील. आज जी फलटण ते पुणे रेल्वे सुरु होत आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मी शब्दात मानू शकत नाही. माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याने निवडणुकीत दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची संपूर्ण ताकद पणाला लावली. त्यांनी स्वतः फलटण ते पुणे रेल्वेबाबत कायम रेल्वे मंत्र्यांकडे आग्रह धरला. त्यामुळेच आज फलटण ते पुणे रेल्वे सेवा हि नियमितपणे सुरु होत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष व आमचे नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा फलटण पुणे रेल्वेसाठी संपूर्ण सहकार्य केले, असल्याचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी बोलताना आवर्जून सांगीतले.

कार्यक्रमास रेल्वे विभागाचे अधिकारी, फलटणकर नागरिक कार्यक्रमस्थळी तसेच ऑनलाईन व्हिडीओ लिंकद्वारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. हिंदुराव यांचे नाव फलटण – पुणे रेल्वेला द्या : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
स्थैर्य, फलटण : माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी फलटण ते पुणे रेल्वेचे स्वप्न पाहून ते सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. तरी फलटण ते पुणे ह्या रेल्वेला माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी या वेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या वेळी केली.


Back to top button
Don`t copy text!