सज्जनगड येथे ‘हिंदू धर्मसंस्कार शिबिर’ उत्साहात संपन्न; सुसंस्कारित पिढी घडवण्याचा निर्धार


युवा पिढीला हिंदू धर्माचे संस्कार मिळावेत आणि धर्माविषयी स्वाभिमान निर्माण व्हावा, या उद्देशाने हिंदू जनजागृती समितीच्या वतीने श्री क्षेत्र सज्जनगड येथे २५ ते २७ मे २०२६ या काळात ३ दिवसीय निःशुल्क निवासी ‘हिंदू धर्मसंस्कार शिबिर’ पार पडले. या शिबिरात विविध मान्यवरांनी युवकांना धर्मशिक्षण, इतिहास आणि स्वरक्षणाचे धडे दिले असून, सातारा, सांगली, पुणे व मुंबईतून आलेल्या युवक-युवतींचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 स्थैर्य, सातारा, दि. ३१ : श्री क्षेत्र सज्जनगड येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन श्री समर्थ सेवा मंडळाचे विनायक बुवा जोशी रामदासी, हिंदू जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे आणि सनातन संस्थेच्या विद्या कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

या शिबिरात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक संत सद्गुरु स्वाती खाडये, श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड संस्थेच्या श्रीमती विद्याताई पुरोहित, हिंदू जनजागृती समितीचे युवा संघटक निरंजन चोडणकर, सौ. भक्ती डाफळे, सौ. रूपा महाडीक, आणि मंगेश निकम यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनाचे प्रमुख विषय:

या तीन दिवसीय शिबिरात बौद्धिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रबोधनावर भर देण्यात आला.

  • राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग.

  • हिंदू देवता, राष्ट्रपुरुष, धर्मग्रंथ, प्राचीन भारत आणि हिंदू वीरांगना.

  • धर्मशिक्षणाचे महत्त्व आणि सध्याच्या युवा पिढीला शत्रुबोध होण्यासाठी लव्ह जिहाद, हलाल जिहाद व धर्मांतरण यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन.

शिबिरातील विशेष उपक्रम:

  • स्वरक्षण प्रशिक्षण: शिबिरार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम बनावेत, यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वैभव क्षीरसागर यांनी बलोपासना स्वरूपाचे स्वरक्षण प्रशिक्षण दिले.

  • गडप्रदक्षिणा व इतिहास: सुहास बुवा देवधर यांनी सर्वांना गडप्रदक्षिणा घडवून आणत सज्जनगडाचा ऐतिहासिक वारसा आणि महत्त्व समजावून सांगितले.

  • प्रदर्शन: क्रांतिकारकांवरील आणि धर्मशिक्षणावरील फ्लेक्स व ग्रंथप्रदर्शनाला शिबिरार्थींसह गडावरील भाविकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला.

शिबिराच्या समारोपावेळी सर्व शिबिरार्थींनी समाधी मंदिरात रामनाम जप करत ‘रामराज्य’ स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेतली. गडावर दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनीही या शिबिरातील विविध सत्रांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.


Back to top button
Don`t copy text!