स्थैर्य, फलटण दि.५ : मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे सोमवार दि. 1 फेब्रु. 2021 रोजी तृतीय वर्ष बी.ए. या वर्गाच्या हिंदी विषयाच्या ’हिंदी साहित्य का इतिहास’ या अभ्यासपत्रिकेच्या सुधारित अभ्यासक्रमाची ऑनलाईन एक दिवसीय कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.
या कार्यशाळेस फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग कौंन्सिलचे अध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रारंभीच यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय, फलटण व हिंदी अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे चार सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन सत्रामध्ये हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भोसले यांनी कार्यशाळेचे उद्घाटन व बीजभाषण केले. यामध्ये आपले विचार मांडताना त्यांनी सुधारित अभ्यासक्रमातील सर्व घटकांचे सविस्तर विवेचन करून संबंधित विषयाचे प्रश्नपत्रिका स्वरुप व गुणतालिका यांचे विश्लेषण केले. उद्घाटन सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी मान्यवर व साधन व्यक्ती तसेच सहभागी प्राध्यापक यांचे स्वागत करून फलटण एज्युकेशन सोसायटी व मुधोजी महाविद्यालय यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मागोवा घेतला. तसेच कार्यशाळेच्या आयोजनाचा उद्देश व स्वरूप स्पष्ट करून सहभागी तथा संयोजकांना महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
प्रथम सत्रामध्ये डॉ. क्षितिज धुमाळ व डॉ. शैलजा पाटील यांनी साधन व्यक्ती म्हणून आपली भूमिका पार पाडली. यावेळी त्यांनी सुधारित अभ्यास पत्रिकेतील प्रथम सत्रातील घटकांचे विवेचन व विश्लेषण करून सहभागी प्राध्यापकांना अध्यापनाची काही महत्त्वपूर्ण तंत्रे सांगून मार्गदर्शन केले. सत्राध्यक्ष डॉ. बाळासाहेब बलवंत यांनी संबंधित अभ्यास पत्रिके संबंधी विद्यार्थी व प्राध्यापक यांना अध्ययन- अध्यापनास उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
द्वितीय सत्रामध्ये डॉ. संग्राम शिंदे व सुश्री. सुपर्णा संसुद्धी यांनी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी संबंधित अभ्यास पत्रिकेच्या द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमाचे घटकानुरूप विवेचन करून सहभागी प्राध्यापकांना अध्यापनास उपयुक्त असे मार्गदर्शन केले. सत्राध्यक्ष डॉ. सुनील बनसोडे यांनी अभ्यास पत्रिकेच्या अध्यापन बाबत मार्गदर्शन करून अंतर्गत मूल्यमापन या घटका संदर्भात विशेष विवेचन केले.
समारोप सत्रामध्ये सहभागी प्राध्यापकांनी अभ्यासक्रम व अध्यापनाबाबत आपल्या काही शंका तसेच सूचना मांडल्या. मान्यवरांनी या शंकांचे निरसन करून त्यांच्या सूचनांची विशेष दखल घेतली. या सत्रामध्ये सदर अभ्यासपत्रिकेच्या सर्व घटकांवर सविस्तर साधक बाधक चर्चा करण्यात आली. या सत्रामध्ये डॉ. गजानन भोसले, प्रा. परसराम रगडे, प्रा. सुचिता भोसले व प्रा. किरण सोनवलकर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात कार्यशाळेच्या आयोजनाबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून या कार्यशाळेच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले.
या कार्यशाळेचे संयोजक हिंदी विभाग प्रमुख डॉ. नितीन धवडे यांनी उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक व संचालन करून या सत्रातील साधन व्यक्तींचा परिचय करून दिला. प्रा. शौकत आतार व डॉ. शिवाजी चवरे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय सत्राचे सूत्र संयोजन करून सदर सत्रातील साधन व्यक्तींचा परिचय करून दिला. कार्यशाळेच्या सह-संयोजक डॉ. सविता नाईक निंबाळकर यांनी समारोप सत्राचे प्रास्ताविक करून सर्व मान्यवर , साधनव्यक्ती व सहभागी प्राध्यापक याचे आभार मानून कार्यशाळेची सांगता केली. या ऑनलाईन कार्यशाळेस प्रा. मंदार पाटसकर व श्री गणेश जाधव यांचे तांत्रिक सहाय्य लाभले. कार्यशाळेस शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयातील सुमारे 100 प्राध्यापक ऑनलाईन सहभागी झाले होते. शेवटी सहभागी प्राध्यापकांना प्रतिसादात्मक अहवालानंतर ऑनलाईन प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.