उच्च कोटीचे यश हीच कष्टाची पावती – प्रो. डॉ. प्रभाकर पवार


दैनिक स्थैर्य | दि. १२ मार्च २०२४ | फलटण |
विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळवलेले उच्च कोटीचे यश हीच त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाची पावती असते, असे विधान मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील मराठी विभागप्रमुख प्रो. डॉ. प्रभाकर पवार यांनी गोंदवले बु. येथे व्यक्त केले.

नवचैतन्य हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गोंदवले बुद्रुक यांनी आयोजित केलेले संत गाडगेबाबा जयंती अभिवादन या कार्यक्रमात डॉ. प्रभाकर पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शाळा समिती सदस्य श्री. धनंजयराव पाटील होते. यावेळी पी. डी. वाघमोडे, संतोष ढोले, दौलतराव नवले, पीएम शिंदे, प्राचार्य सुधीर अहिवळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. प्रभाकर पवार म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या मातीला व मातेला विसरता कामा नये आणि ज्या प्रशालेत शिकलो घडलो, वाढलो त्या प्रशालेला न विसरता प्रशालेचे नाव मोठे केले पाहिजे. आपण कोणत्याही क्षेत्रात जा तिथे तन-मन-धन अर्पण करा. संयम, चिकाटी आणि कष्ट याच्या जोरावर उच्चप्रतीचे यश खेचून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. मिळणारे यश हे तुमचेच असेल. स्वप्ने मोठी बघा, छोटी-छोटी स्वप्ने बघणे हा गुन्हा आहे. आपला माणदेश जरी दुष्काळी भाग असला तरी वाळवंटातच हिरवे मळे फुलवण्यासाठी व आपल्या मातीची शान राखण्यासाठी, थोरामोठ्यांचे आदर्श व प्रेरणा डोळ्यांसमोर ठेवा, असेही दहावीच्या मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा देताना डॉ. प्रभाकर पवार यांनी आवर्जून सांगितले.

अध्यक्षपदावरून बोलताना श्री. धनाजीराव पाटील म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी योग्य वापर केला पाहिजे. अभ्यास, चिंतन, मनन करून परीक्षा देऊन उच्च प्रतीचे यश मिळवले पाहिजे.

यावेळी दहावीच्या वर्गातील कु. प्राची जाधव, कु. दिशा भोसले, कु. नंदिनी कदम, कु.संचिता पाटोळे, कु. रिया कट्टे, कु. श्रुती तिवाटणे, श्री. अथर्व नवले, श्री. हर्ष रणपिसे इ. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केली.

संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. श्री. शरद कणसे यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी श्री. पोपट यादव यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

प्रास्ताविक प्राचार्य सुधीर अहिवळे यांनी केले. कार्यक्रमाला पर्यवेक्षक पोपट यादव, श्री. गोरख टेंबरे, महादेव यादव, सौ. वनिता गायकवाड, श्री. नानासाहेब तांबे, श्री. विठ्ठल काकडे, श्री. शिवलिंग सावंत, सौ. सुनीता जाधव यांच्यासह दहावीच्या वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!