सलग तीन दिवस कोसळणाऱ्या धुवाँधार पावसाने जनजीवन विस्कळीत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, महाबळेश्वर, दि. ०६ : महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून कोसळणाऱ्या धुवाधार पावसाने आपले शतक पार केले असून गेल्या चोवीस तासात बारा इंच पावसाची नोंद झाली आहे महाबळेश्वर–पांचगणी मुख्य रस्ता वेण्णालेक नजीक पाण्याखाली गेल्याने वाहतूक मंदावली या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची दैना उडाली लिंगमळा परिसर देखील जलमय झाला होता.

महाबळेश्वर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून संततधार पावसाने महाबळेश्वर पांचगणी मुख्यरस्ता हा वेण्णालेक नजीक सुमनराज परिसरात पाण्याखाली गेला यामुळे वाहतूक काहीकाळ मंदावली  रात्रभर धुवाधार पाऊस कोसळत होता मात्र शहरात कोणत्याही प्रकारची वित्तहानी झाली नाही वेण्णालेक रास्ता तसेच लिंगमळा परिसराची पाहणी मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केली व या परिसरातील नागरिकांशी चर्चा केली ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभीपासूनच धुवाधार बॅटिंग सुरु केली असून संततधार पावसाने जनजीवन मात्र विस्खळीत झाले आहे मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट असल्याचे पाहावयास मिळाला. चालू वर्षी अगदी वेळेवर आगमन झालेल्या मान्सूनची चक्री वादळाने दशा आणि दिशा बदलून टाकल्याने पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरकडे पावसाने अक्षरशः पाठ फिरवली होती . त्यामुळे मागील वर्षीपेक्षा या वर्षी पावसाची तीव्रता कमी झाली असून ऐन पावसाळ्यात ऊन पावसाने शेतकरी, सर्व जनमानसात धाकधूक  वाढली होती. या वर्षी सरासरी पाऊस तरी होतो की नाही ही चिंता व्यक्त होत होती. मधल्या काळात तर पाऊस कूठे गायब झाला आहे हा सगळ्यांच्या चर्चेचा विषय झाला होता. निम्मा पावसाळी हंगाम संपला तरीदेखील सरासरीच्या तुलनेत १/४ देखील पाऊस न पडल्याने महाबळेश्वर परिक्षेत्रामध्ये येणाऱ्या कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर धरण व्यवस्थापना सोबत शेतकरी वर्गामध्ये देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. भात लागणी योग्य पाऊस  न झाल्याने  काही शेतकऱ्यांनी तर पंपाने पाणी भातलागणी साठी वापरले होते. आणि आत्ता जर पाऊस झाला नाही तर भातावर करपा पडून  शेतकरी वर्गाच्या कष्टावर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर अचानक वाढला व गत २४ तासात तब्बल ३२० मि.मी इतक्या विक्रमी पावसाच्या नोंदी बरोबर चालू हंगामामध्ये आजपर्यंत २४८७ मि.मी (९७ इंच)  इतका पाऊस पडल्याचे हवामान खात्यामार्फत सांगण्यात आले आहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे  नदी नाल्यांनी उग्ररुप धारण केले आहे. त्यामुळे येथील जनजीवन काहीश्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत आहे.

पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या संतत धार पावसामुळे कोयना धरणासोबत धोम बलकवडी व कण्हेर धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असताना महाबळेश्वर परिसरा मधील भात शेतीला देखील संजीवनी मिळाल्याने बळीराजा बरोबर सर्वसामान्य  सुखावले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!