दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२३ । सातारा । मोजे मोरेवाडी येथे भूस्खलन झालेल्या भागातील स्थलांतरीत ग्रामस्थांसाठी ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य शिबीर घेण्यात आले. यावेळी प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबीरामध्ये ग्रामस्थांना जलजन्य आजार, किटकजन्य आजार, वैयक्तिक स्वच्छता याविषयी तसेच आरोग्य शिक्षण देण्यात आले.
या शिबीरामध्ये 54 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीमध्ये स्थलांतरीत भागामध्ये अतिसार, हगवण, गॅस्ट्रो या आजाराचे कोणतेही रुग्ण आढळून आलेले नाहीत. तसेच एकही गरोदर माता नाही. या ठिकाणचे पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आल्याची माहिती ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.