
दैनिक स्थैर्य | दि. 01 ऑगस्ट 2024 | फलटण | माण तालुक्याचे सुपुत्र तथा फलटण येथील मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे माजी विद्यार्थी हर्षकुमार वर्धमान निकम हे महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागामध्ये गेली २८ वर्षे अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांची नुकतीच राज्यकर सहआयुक्त पदावरून अप्पर राज्यकर आयुक्तपदी मुंबई येथील माजगाव विक्रीकर भवन येथे पदोन्नती झाली आहे.
हर्षकुमार निकम हे राज्याच्या विक्रीकर विभागांमध्ये एक मनमिळावू, सर्वसमावेशक, कर्तव्यदक्ष व सतत कार्यक्षम असणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण विक्रीकर विभागाचे संगणकीकरण केले असून केंद्र सरकार मार्फत दिल्ली येथे वेळोवेळी आयोजित केलेल्या जी.एस.टी. संदर्भातील सेमिनारसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांनी या सेमिनारमध्ये राज्य शासनाचे प्रतिनिधित्व केले आहे.
त्यांच्या या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागाने सलग ३ वेळा हर्षकुमार निकम यांच्या आय.ए.एस. पदासाठीचे नामांकन केले आहे. त्यांच्या या पदोन्नती बद्दल सातारा जिल्ह्यातील सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.