स्थैर्य, मुंबई, दि.२५: महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील जनतेला नाताळ उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाचा नाताळ आपण सर्वांनी उत्साहात, आनंदात साजरा करीत असताना राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन नाताळ उत्सव साजरा करण्याचे आवाहनही केले आहे.
आपल्या शुभेच्छा संदेशात महसूलमंत्री श्री.थोरात म्हणाले, नाताळ सणाचा आनंद लुटत असताना आपण सर्वांनीच केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आनंदासह आरोग्य आणि सुरक्षितता जपणे आवश्यक आहे. संपूर्ण जगावर, देशावर आणि राज्यावरचे कोविड-19 चे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता ख्रिश्चन बांधवांनी यावर्षी नाताळ सण साधेपणाने साजरा करावा.
नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व शारिरीक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) राखले जाईल याची प्रामुख्याने काळजी घ्यावी. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.