स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 23 : जगभर कोरोना व्हायरसनं थैमान घातलंय. या आरोग्य संकटातही सौदी अरेबियाकडून हज यात्रेचं आयोजन केलं जाणार आहे. मात्र, यंदा केवळ सौदी अरेबियात राहणाऱ्यांनाच हज यात्रेला जाता येणार आहे.
सौदी अरेबियाचे हज आणि उमरा विषयक मंत्रालयानं सोमवारी यासंदर्भात एक पत्रक जारी केलं. त्यानुसार, कोरोनाचं संकट असल्यानं मर्यादित लोकांनाच हज यात्र करण्याची परवानगी दिली जाईल.
हज यात्रेसाठी जगभरातून लाखो लोक येत असतात. मात्र, यंदा सौदी अरेबियाच्या बाहेरील कुणालाही परवानगी दिली जाणार नाहीय.
कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी सोशल डिस्टन्सिंग किंवा इतर खबरदारीचे उपाय करण्यात आलेत. त्यानुसार हा निर्णय सौदी अरेबियानं घेतलाय.
सौदी अरेबियातले जे लोक हजसाठी येतील, त्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठीही सर्व उपाययोजना केल्या जातील.
इस्लामिक कॅलेंडर चंद्रानुसार बदलत राहतं. हज बकरी ईदच्या काळात असते. मात्र यंदा हजचं आयोजन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होतंय.
इस्लामच्या पाच मूलभूत स्तंभांपैकी शेवटचा स्तंभ हज मानला जातो. शारीरिक आणि आर्थिक रुपानं सक्षम असलेले मुस्लीम नागरिक आयुष्यात एकदा तरी हजची यात्रा करण्याची इच्छा बाळगून असतात.
त्यामुळेच दरवर्षी जगभरातून 20 लाखांहून अधिक मुसलमान हज यात्रेसाठी मक्केत पोहोचतात. यंदा मात्र इतर देशातील भाविक हजला जाऊ शकणार नाहीत.
कोरोनाचं आरोग्य संकट पाहता, यंदा हज यात्रा रद्दच होते की काय, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, सौदी अरेबियानं यात मध्यम मार्ग काढत, आरोग्य सुरक्षेची खबरदारी घेऊन केवळ सौदी अरेबियातील भाविकांनाच हजला येण्याची परवानगी दिली.
एप्रिल महिन्यातच सौदी अरेबियातील हजसंबंधी मंत्री मोहम्मद सालेह बंतेन यांनी जगभरातील भाविकांना सांगितलं होतं की, हजला येणाऱ्यांच्या आरोग्याची सौदी अरेबियाला काळजी आहे. त्यामुळे कुणीही हजला येण्यासाठी बुकिंग करण्याची घाई करू नये.
सौदी अरेबियात आजच्या घडीला कोरोनाचे एकूण एक लाख 61 हजारहून अधिक रुग्ण आहेत. 307 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्याच आठवड्यात सौदी अरेबियानं लॉकडाऊन हटवलंय.