
दैनिक स्थैर्य | दि. ९ जून २०२३ | सातारा |
ऐतिहासिक वारसा आणि साहित्य सेवेची परंपरा असलेल्या कराड तालुक्यातील मसूरमध्ये रविवारी (दि. ११ जून) अठरावे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन साजरे होत आहे. यामध्ये प्रकट मुलाखत, परिसंवाद, कवी संमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. महाराष्ट्रासह गोवा तसेच सीमा भागातील साहित्यिक व साहित्य रसिक या संमेलनात सहभागी होणार आहेत.
‘गुंफण अकादमी’च्या वतीने मसूर येथील ‘रायचंद भोजराज लॉन’ या ठिकाणी हा साहित्याचा सोहळा साजरा होणार असून संमेलनस्थळाला ‘यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी’, तर व्यासपीठाला ‘समाजभूषण रामचंद्र चेणगे व्यासपीठ’ नाव दिले आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान सीमा भागातील ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील भूषवणार असून ज्येष्ठ विचारवंत व प्रसिद्ध वक्ते प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे संमेलनाचे उद्घाटक आहेत. रविवारी सकाळी ९.३० वाजता उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी पुण्याचे जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक, प्रसिद्ध ग्रामीण कथाकार बबन पोतदार, सातारच्या माजी उपनगराध्यक्षा दीपाली गोडसे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सातारा जिल्हा उपप्रमुख अमोल आवळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच समारंभात प्रेमलाताई चव्हाण स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी दिली.
रविवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत प्रसिद्ध पटकथा व संवाद लेखक विशेषतः स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ रंगकर्मी सुजित शेख व राजीव मुळ्ये घेणार आहेत. दुपारी १२ ते १ या वेळेत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्तमान साहित्यातील बदलते प्रवाह’ या विषयावरील परिसंवाद रंगणार आहे. त्यामध्ये मधुकर पाटील (कोल्हापूर), प्राचार्य अनिल बोधे (रहिमतपूर), ज्येष्ठ पत्रकार राजीव मुळ्ये (सातारा) व प्रकाश क्षीरसागर (गोवा) हे सहभागी होणार आहेत.
दुपारी २ ते ३.४५ या वेळेत निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून त्याचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध कवी व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. प्रदीप पाटील भूषवणार आहेत. कवी संमेलनात गोव्यातील चित्रा क्षीरसागर, प्रकाश क्षीरसागर, दशरथ परब, पौर्णिमा केरकर, आसावरी कुलकर्णी, महाराष्ट्रातील सुवर्णा मस्कर, स्वाती बाजारे, छाया जाधव, वसंत पाटील, प्रशांत लिंगडे, मनीषा पाटील – हरोलीकर, सुभाष कवडे, रघुराज मेटकरी व रणजीत निकम सहभागी होणार आहेत.
दुपारी ४ ते ५.३० वाजता गुंफण पुरस्कार वितरण व संमेलन समारोप समारंभ खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या समारंभात प्रसिद्ध ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांचा अमृत महोत्सवी सत्कार व डॉ. बसवेश्वर चेणगे संपादित ‘रामसेतू ते पुनर्जन्म’ पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, कथाकार बबन पोतदार, न्यायमूर्ती सुनील वेदपाठक, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे साहित्य संमेलन रसिकांसाठी अपूर्व पर्वणी असल्याने साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. चेणगे यांनी केले आहे.