दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाच्या निसर्गमित्र गटाने कोशिंबळे या गावात भात शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबद्दल शेतकर्यांना माहिती दिली. यामध्ये लीफ कलर चार्टचा वापर कसा करावा, याविषयी सांगण्यात आले.
भात शेतीतील नत्राच्या उपलब्धतेचे मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पानांच्या रंग तक्त्याच्या वापराचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. शेतकर्यांना एलसीसी वापरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे, त्याचे फायदे आणि तोटे तसेच एलसीसी मूल्यांचे स्पष्टीकरण याबद्दल माहिती देण्यात आली.
शेतकर्यांना तक्त्यामधील वेगवेगळ्या रंगाविषयी माहिती दिली. प्रत्यक्ष शेतात उतरून भाताच्या पानाचे रंग तक्त्यामधील रंगाला जुळवून त्याविषयी माहिती सांगितली. जर पानाचा रंग गडद हिरवा असेल तर नत्राचे प्रमाण योग्य आहे, पण जर पानांचा रंग फिकट हिरवा किंवा पिवळा असेल तर नत्राचा वापर करणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आले. याचा एक तोटा म्हणजे जर शेतात स्फुरद आणि पालाश याचे प्रमाण जास्त असेल तरी पानाचा रंग गडद हिरवा असतो, पण नत्र कमी असेल तर यावेळी समजून येत नाही.
या प्रात्यक्षिकाला कोशिंबळे गावातील व आसपासच्या परिसरातील शेतकर्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. वरील कार्यक्रमाचे आयोजन सुमेध वाकळे, अनिश जगताप, जीवन गोडसे, आकाश जाधव, अनिकेत काजरेकर, लक्ष्मण माळगी, रिषभ मोरे यांनी केले. यासाठी कृषी विज्ञान केंद्र, रोहा केंद्रप्रमुख डॉ. मनोज तलाठी सर व ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी श्री. जीवन आरेकर सर, विषयतज्ज्ञ डॉ. व्ही. जी. चव्हाण सर यांचे मार्गदर्शन लाभले.