पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांना फलटणमध्ये इंटरेस्ट नाही ?


दैनिक स्थैर्य | दि. 16 जुन 2025 | फलटण | प्रसन्न रूद्रभटे | गत काही दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान हे फलटण तालुक्यात झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली होती. तरी सुद्धा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले ना. शंभूराज देसाई हे फलटणमध्ये फिरकले सुद्धा नाहीत. ना. शंभूराज देसाई यांच्या पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत फलटण तालुका येत नाही ?, का ते फक्त पाटण व सातारा तालुक्याचे पालकमंत्री आहेत ? की मंत्री देसाई यांना फलटण तालुक्यात इंटरेस्ट नाही, अशा चर्चा आता फलटण तालुक्यात सुरू झाल्या आहेत.

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी काल श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नीरा नदी स्नान व लोणंद पालखी तळावर भेट देत पाहणी केली. त्यावेळी सुद्धा त्यांनी सातारा जिल्ह्यात सर्वाधिक मुक्काम असणाऱ्या फलटण तालुक्यातील एकाही पालखी तळाला भेट दिली नाही.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा सातारा जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. त्यामध्ये खंडाळा तालुक्यात लोणंद या एकाच ठिकाणी मुक्कामी असतो, तर फलटण तालुक्यातील तरडगाव, फलटण व बरड या तीन ठिकाणी मुक्कामी असतो. फलटण तालुक्यातील एकही पालखी तळाला भेट न दिल्याने पुन्हा एकदा मंत्री देसाई यांना फलटण तालुक्यात इंटरेस्ट नसल्याचे दिसून येत आहे.

महायुतीत फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे ?

फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील हे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सोडला आहे का ? असा प्रश्न सुद्धा उपस्थित राहत आहे.

महायुतीसाठी रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांनी लढवली फलटणची खिंड

फलटण येथे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने फलटणचे सुपुत्र माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी खिंड लढवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून तातडीची मदत मिळवत अगदी एनडीआरएफची एक तुकडी फलटण येथे तैनात करण्यात आली होती.

यासोबतच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे तर फलटणला पूरपरिस्थिती झाल्यानंतर तातडीने फलटणकडे रवाना झाले व पाण्यामध्ये स्वतः उतरत नागरिकांना मदत केली असल्याचे बघायला मिळाले आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करता पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी फलटणकडे पाठ फिरवली असल्याचे निदर्शनास येत आहे.


Back to top button
Don`t copy text!