अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, नांदेड, दि. २०: नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीसह अनेक भागात नदी-नाले, ओढ्यांना पूर आल्यामुळे काही भागातील शेतकऱ्यांची शेतातील माती पिकासह वाहून गेली आहे. या नुकसानीची मला कल्पना असून जिल्ह्यात यापूर्वीच एक व्यापक आढावा बैठक बोलवून प्रत्येक ठिकाणचे पंचनामे करण्याचे निर्देश मी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. शासन स्तरावरुन शेतकऱ्यांसाठी जे काही करता येणे शक्य आहे ते जरुर करु या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन धीर दिला.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा झालेल्या आढावा घेण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह भोकर तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन पाहणी केली. शेताच्या बांधावरच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम, जिल्हा परिषद सदस्य प्रकाशराव भोसीकर, भोकरचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कोरे, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर तालुक्यातील खरबी, वाकद, आमदरी, भोसी, धानोरा, अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर, मालेगाव या गावात त्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी अडचणी समजून घेतल्या. अनेक गावांमध्ये पाण्याच्या अतिप्रवाहामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लहान मोठे नाले यांच्या जलव्यवस्थापनाच्या दृष्टिने विचार करुन उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी कृषि विभागाला दिले. नाला खोलीकरण करुन ज्या-ज्या ठिकाणी बंधारे शक्य आहेत त्याचे सर्वेक्षण, पूलाची उंची वाढविणे, पांदण रस्ता दर्जावाढ, स्मशानभुमीला संरक्षण भिंत, आमदरी गावातील नादुरुस्त असलेल्या दोन वन तलावाची दुरुस्ती याबाबत त्यांनी आढावा घेतला.

पीक विमा भरलेल्या व पिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रार अर्जांची स्विकृती करुन तात्काळ त्याचे पंचनामे करणे, विमा कंपनीशी समन्वय साधत शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे विमा मिळण्यासाठी तात्काळ मदत करणे यावर त्यांनी भर देत अधिकाऱ्यांना निर्देश देत ज्या ठिकाणी नवीन काम हाती घेतले जाणार आहे त्याचे अंदाजपत्रकही सादर करण्यास सांगितले. खरबी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ग्रामसेवक आणि तलाठी या दोघांनी समन्वय साधत प्रत्येक गावात चावडी वाचन, नुकसानीचे पंचनामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी तत्पर रहा असेही त्यांनी स्पष्ट केले. खरबीचे सरपंच गंगाधर लक्ष्मण पाशीमवाड यांनी खरबी ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचे स्वागत केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!