दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२१ । मुंबई । अभिजात मराठी भाषेचे दालन राज्यातील सर्व जनतेला पाहण्यासाठी विधानभवन परिसरात दुपारी बारा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे दालन दि. 31 डिसेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. अभिजात मराठी भाषेच्या दालनाला अवश्य भेट देऊन लघुपटही पाहावा, असे आवाहन मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.
दि. 22 ते 28 डिसेंबर 2021 या कालावधीत महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन कालावधीत मराठी भाषा विभागाद्वारे “अभिजात मराठी भाषेचे दालन” विधानभवन परिसरात उभारण्यात आले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सदस्यांनी मराठी भाषेच्या या दालनाला भेट देत समाधान व्यक्त केले. या दालनाला मंत्री, राज्यमंत्री, सर्वपक्षीय आमदार, विधीमंडळातील आणि मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह कामकाजासाठी असलेले पोलीस कर्मचारी, आरोग्य सेवक यांनी भेट दिली.
अधिवेशन कालावधीत किमान तीनशे लोकांनी या दालनाला भेट दिली आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहून इथे ठेवलेल्या पत्रपेटीत पत्र टाकले आहे. या दालनातच दाखविण्यात येत असलेले “शांतता! मराठीचे कोर्ट चालू आहे” हा लघुपट बघुन मराठी भाषेचा प्रवास समजण्यास मदत झाली असल्याची प्रतिक्रिया इथे उपस्थित प्रेक्षकांनी दिली आहे.
अभिजात मराठी भाषेचे दालन
अभिजात मराठी भाषेच्या दालनामध्ये मराठी भाषा ही किमान दोन हजार वर्षापूर्वीची भाषा असून त्याबाबतच्या सबळ पुराव्यांचे आणि त्याच्याशी संबंधित शिलालेखांच्या प्रतिकृती, नाणी, ताम्रपट, प्राचीन ग्रंथांमधील उल्लेख, भाषेचे टप्पे, निर्माण झालेले विविध वाङ्मयप्रकार, महत्त्वाचे प्रमुख ग्रंथ यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन करण्यात आले आहे.
मराठी भाषेची अभिजातता सिद्ध करणारा लघुपट
मराठी भाषेची अभिजातता सिद्ध करण्यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार सुमारे अठरा मिनिटांच्या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या लघुपटामध्ये न्यायालयीन प्रसंगाची योजना करून वाद-विवाद आणि संवाद यांच्या माध्यमांतून सर्वसामान्य जनतेपर्यंत सोप्या पद्धतीने मराठी भाषा विभागाचे म्हणणे मांडण्यात आले आहे.