स्थैर्य, फलटण, दि. १२ (प्रसन्न रुद्रभटे) : फलटण तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांचा प्रचार चांगलाच शिगेला पोचला असून मतदानासाठी अवघे 4 दिवस राहिले असल्याने संपूर्ण प्रभाग पिंजून काढण्यासाठी उमेदवारांसह राजकीय नेते व कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून पळताना दिसत आहेत. तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायतींवर राजे गटाचीच सत्ता असली तरी ही सत्ता अबाधित राखण्यासाठी राजे गटापुढे अनेक ठिकाणी त्यांच्याच गटातल्या बंडखोरांचे आव्हान उभे राहिले आहे तर सत्तांतर्याच्या प्रयत्नात असणारे विरोधक प्रचारादरम्यान समस्यांचा पाढा वाचताना दिसत आहेत.
ग्रामपंचायत निवडणूकांसाठी दि.15 रोजी मतदान होत असून 18 रोजी निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी अवघे 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायती व प्रभाग बिनविरोध झाले असून उर्वरित ठिकाणी मात्र प्रचाराच्या रस्सीखेचीने निवडणूकीत चांगलाच रंग भरला आहे. महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे पॅनेलच्या निवडणूकीतील रणनितीवर स्वत: महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे फलटण तालुक्यातील साखरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक स्थानिक राजकीय घडामोडींमुळे ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मोठ्या प्रतिष्ठेची केली असल्याचे बोलले जात आहे. तर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तालुक्यातील प्रचार यंत्रणेत पूर्णपणे कार्यरत आहेत. अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार ‘मी देखील राजे गटाचाच आहे’ असा उघड उघड प्रचार करत असल्याने अशा ठिकाणी ‘नक्की राजे गटाचा कोण?’ हा मतदार व कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्यात श्रीमंत संजीवराजे यांना मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने पुरस्कृत केलेल्या विविध गावातील पॅनेलच्या रणनितीवर स्वत: माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर लक्ष ठेवून असून प्रमुख ठिकाणी सभा, बैठका, मतदारांच्या गाठी – भेटी देखील ते घेत आहेत.
गावगाड्यात निवडणुकीचा प्रचार करत उमेदवारांना संपूर्ण प्रभाग पिंजून काढावा लागतो त्यामुळे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरत होताना दिसत आहे. कमी काळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने उमेदवारांनी प्रचाराची राळ उडविली आहे. सकाळी लवकर सुरु होणारा प्रचार अगदी दिवसभर आणि शिवाय रात्री उशीरापर्यंत न दमता सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये कॉर्नर सभा, प्रचार रॅली, मतदारांच्या ‘होम टू होम’ गाठीभेटी अशा थेट प्रचाराबरोबरच सोशल मीडियाचाही आधार प्रचारासाठी घेतला जात आहे़. व्हॉटस्अॅप, फेसबुकद्वारे उमेदवार मतदारांच्या संपर्कात राहत आहेत. उमेदवार व कार्यकर्ते बाहेरगावी असलेल्या मतदारांची नावे शोधून त्यांना मतदानाची तारीख आणि मतदान केंद्राची माहिती देत आहेत.
फलटण तालुक्यात विशेषत: कोळकी, साखरवाडी, निंभोरे व जाधववाडी (फ.) या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामपंचायती मानल्या जातात. यापैकी कोळकी ग्रामपंचायतीच्या एका प्रभागात राजे गटाअंतर्गत मैत्रीपूर्ण लढत, तर काही प्रभागात नावापुरते निवडणूकीचे वातावरण आहे. तर उर्वरित प्रभागांमध्ये राजे गटाचे अधिकृत उमेदवार, राजे गटाचे बंडखोर उमेदवार आणि भाजप पुरस्कृत उमेदवार यांच्यात ‘काटे की टक्कर’ पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काही प्रभागात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारांना मोठी ताकद दिल्याने या ठिकाणी चांगलाच सामना रंगणार आहे.
साखरवाडी ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत होत असून राजे गट, पाटील गट आणि विक्रम भोसले गट अशी निवडणूक रंगणार आहे. विक्रम भोसले गटाने विविध विकासकामांद्वारे आपली वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे. तर न्यू फलटण शुगर वर्क्सचे माजी चेअरमन प्रल्हादराव साळुंखे – पाटील यांना देखील मानणारा जुना वर्ग मोठ्या प्रमाणावर याठिकाणी आहे. येणार्या काळात सरपंच कुणाचा करायचा? सत्ता कुणाच्या ताब्यात द्यायची? यात पाटील गटाची महत्त्वाची भूमिका ठरेल अशी चर्चा सुरु आहे. तर विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून ‘न्यू फलटण शुगर वर्क्स’ला नवसंजीवनी मिळालेली असल्याने त्यांचे देखील समर्थक या ठिकाणी लक्षणीय आहेत. त्यामुळे साखरवाडीचा निकाल तालुक्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे.
जाधववाडी (फ) ग्रामपंचायत निवडणुकीत होत असलेली दुरंगी लढत राजे गटाला मानणाऱ्या मंडळींमध्येच होत असल्याने या ठिकाणी कोणत्याही दिग्गज नेत्याचा सहभाग दिसत नसून स्थानिक कार्यकर्तेच प्रचार यंत्रणा हाताळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
तालुक्यात दांडगा संपर्क असलेले युवा नेते दिगंबर आगवणे हे देखील आपापल्या समर्थकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना मोठी ताकद दिली आहे. तर राजे गटाला अनेक ठिकाणी अंतर्गत गटबाजीला सामोरे जात असतानाच तालुक्यात आजवर झालेला विकास व पुढील काळातील योजना मतदारांना पटवून द्याव्या लागत आहेत. मात्र तालुक्याच्या कानाकोपऱ्यात राजे गटाच्या कार्यकर्त्यांचे जाळे घट्ट असल्यामुळे प्रचारात सरस ठरण्यात त्यांना यश येत आहे.
‘एकवेळ शहरातला प्रचार परवडला, पण गड्या गावातलं राजकारण काही कुणाला कळत नाही’ अशा प्रतिक्रिया प्रचार यंत्रणेत कार्यरत असलेल्या सर्वच गटातील कार्यकर्त्यांमधून मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहेत. अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्याने प्रचाराची सूत्रे युवा वर्गाच्या ताब्यात दिसत आहेत. गावाची पाणीपुरवठा योजना, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, मंदिरे, स्वागत कमान, बस स्टँड, गावातील शाळा, रोजगार हेच गेल्या अनेक वर्षांपासूनचे सर्वसाधारण मुद्दे प्रचारात गाजत असल्यामुळे, ‘कोणीही निवडून आल तरी काय वेगळं करणारे’, अस म्हणून निवडणुकीकडे सपशेल दुर्लक्ष करणारा वर्ग देखील सर्वच ठिकाणी आहे. त्यामुळे मतदार राजा मतदानावेळी कुणाला कौल देतो हे पाहण्यासाठी 18 जानेवारी पर्यंत संपूर्ण तालुक्याची उत्कंठा टिकून राहणार आहे.