स्थैर्य, फलटण दि. २४ : फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींसाठी दि. २३ ते ३० डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत, तथापी आज पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी समीर यादव यांनी सांगितले.
येथील नवीन शासकीय धान्य गोदाम, शासकीय विश्राम गृहाशेजारी येथे ४८ टेबल द्वारे सर्व ८० ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तथापी आज एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
उमेदवाराने ऑनलाइन अर्ज भरुन त्याची प्रिंट काढून त्यासोबत आवश्यक दाखले, स्वयं घोषणा पत्र व अन्य कागद पत्र जोडून अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करावयाचा आहे.
सन १९९५ किंवा त्यानंतर जन्मलेला उमेदवार ७ वी उत्तीर्ण असला पाहिजे ही अट प्रथमच घालण्यात आली आहे, आतापर्यंत ग्रामपंचायत निवडणूकीत शिक्षणाची अट कधीच घालण्यात आली नाही, यावेळी प्रथमच शिक्षणाची अट १९९५ किंवा नंतर जन्मलेल्या उमेदवारांसाठी घालण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.