शासनाने ‘यशवंतराव चव्हाण साहित्य अकादमी’ : जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ‘‘मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यासाठी नवमहाराष्ट्र झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी या क्षेत्रासाठी तत्कालीन राज्यशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश मंडळ, लोकसाहित्य समिती, मराठी भाषा विभाग, रंगभूमी परीक्षण मंडळ, स्थापन केले. राज्यातील विभागीय साहित्य परिषदांचे एकत्रीकरण करून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ स्थापनेसाठी सहकार्य केले. या संस्थांना अनुदान सुरू करून मराठी ग्रंथांना पुरस्कार देण्याची योजनाही सुरू केली. त्यांचे हे सर्व योगदान लक्षात घेऊन नव्या महाराष्ट्र शासनाने ‘यशवंतराव चव्हाण साहित्य अकादमी’ सुरू करून मराठी भाषेच्या सर्व शासकीय संस्था या अकादमीच्या नियंत्रणात आणाव्यात’’, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेचे अध्यक्ष व मसाप सातारा जिल्हा प्रतिनिधी, जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी केली.

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या 40 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ.सचिन सूर्यवंशी (बेडके) यांच्यासह व्यासपीठावर मार्गदर्शक रवींद्र बर्गे, प्रा.विक्रम आपटे उपस्थित होते.

‘‘यशवंतराव चव्हाण राजकारणाशिवाय एक उत्तम रसिक, वाचक, लेखक व कवी मनाचे होते. त्यांचे ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र एका वेगळ्याच प्रांजळ शैलीने लिहिलं आहे. पण मराठी साहित्य विश्वाने त्याची काही दखल घेतली नाही. अनेक पुरस्कार मोठ्या मोठ्या मान्यवरांना मरणोत्तर दिले जातात त्याप्रमाणे स्व.यशवंतराव चव्हाण यांचे मराठी भाषा, साहित्य संस्कृती आणि साहित्य लेखनातील योगदान लक्षात घेऊन त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेने मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार दिला पाहिजे’’, अशी अपेक्षाही यावेळी बोलताना रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.

डॉ.सचिन सूर्यवंशी (बेडके) म्हणाले, ‘‘यशवंतराव चव्हाण हे एक उत्तम साहित्यिक व रसिक व्यक्तिमत्त्वाचे होते. त्यांच्या साहित्यावर आजही चर्चासत्रे झाली पाहिजेत यातून नव्या पिढीला मार्गदर्शन मिळेल.यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय सुसंस्कृतपणाचा वारसा आजच्या राज्यकर्त्यांनी जपला तर पुन्हा एकदा सुसंस्कृत व प्रगत महाराष्ट्र अनुभवता येईल. येथील म.सा.प शाखेच्या वतीने स्व.यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दी पासून साहित्यिक कृतज्ञता म्हणून फलटणमध्ये गेली 12 वर्षे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते.त्यासाठी आमचे सर्व सहकार्य कायमच राहील’’.

‘‘म.सा.प फलटण तर्फे दरवर्षी होणारे यशंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन यावर्षीच्या  विधानसभा निवडणुकीमुळे दि.25 नोव्हेंबरला होऊ शकले नाही. तथापि आता नजिकच्या काळात हे संमेलन घेतले जाईल. यंदाच्या संमेलनाचा केंद्रबिंदू शिक्षण विषयक असल्यामुळे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या स्मृतीनिमित्त फलटण तालुक्यातील शिक्षकांच्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातील’’, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष महादेवराव गुंजवटे यांनी आपल्या भाषणात दिली.

‘स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आधार आजही आवश्यक वाटतो; यातच यशवंतरावांच्या कार्य कर्तृत्वाचे महत्व लक्षात येते. स्व.यशवंतराव यांचे सुसंस्कृत राजकारणाचे बोट महारष्ट्रातील राज्यकर्त्यांनी सोडल्याची जाणीव प्रत्येकाला होत आहे’’, असे मत प्राचार्य शांताराम आवटे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक म.सा.प. कार्यवाह अमर शेंडे यांनी केले तर आभार सदस्य मनीष निंबाळकर यांनी मानले. कार्यक्रमास म.सा.प. फलटण शाखा पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!