दैनिक स्थैर्य । दि. ०३ एप्रिल २०२३ । कोल्हापूर । शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येत्या जूनमध्ये पूर्ण होण्यासाठी आवश्यक बाबींची तातडीने पूर्तता करा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या.
शासकीय तंत्रनिकेतन मुलांच्या वसतिगृहामागील जागेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची इमारत बांधण्यात येणार आहे. या जागेची पाहणी करुन महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्षातील कामकाजाच्या अनुषंगाने आवश्यक बाबींबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ.डी.एम. गर्गे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक (पुणे) डॉ. डी. व्ही. जाधव, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, कार्यकारी अभियंता संजय जाधव, करवीर चे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा सुरवातीपासूनच उत्कृष्ट राहण्यासाठी योग्य नियोजन करावे. विद्यार्थ्यांना सर्व पायाभूत सुविधा द्याव्यात, अशा सूचना देवून मंजूर पदे, रिक्त पदे, इमारतीचा आराखडा, त्यातील बदल आदी विषयांचा आढावा मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी घेतला. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची 10 एकर जागा लवकरात लवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नावे हस्तांतरीत करण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्राचार्य श्री. डॉ. गर्गे यांनी नियोजित कामांचे सादरीकरण केले. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी जागेची मोजणी झाली असल्याचे सांगून टेंडर प्रक्रियेच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली.