स्थैर्य, फलटण, दि २२: महाराष्ट्रातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सने जागतिक दर्जाची उत्पादने बाजारात आणली आहेत. ‘गोविंद’ने तयार केलेल्या या जागतिक दर्जाच्या या उत्पादनांमुळे निश्चितच दुग्ध उत्पादकांचे आर्थिक गणित बेरजेच्या दिशेने जाणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ‘गोविंद’च्या या उत्पादनांना जगाच्या बाजारपेठेत मागणी वाढत आहे. दुबई येथे होत असलेल्या गल्फ फूड २०२१ या आंतरराष्ट्रीय एक्झिबिशनमध्ये ‘गोविंद’च्या उत्पादनांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सने गल्फ फूड्स २०२१ या जागतिक पातळीवरील एक्झिबिशनमध्ये गोविंदच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन मांडले आहे. यानिमित्ताने श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर सध्या दुबई दौऱ्यावर आहेत.
सध्या अनियमित असलेल्या निसर्गाने शेती व्यवसायाला अडचणीत आणले असले तरी दुग्ध व्यवसायाने शेतकऱ्याला तारले आहे. शेतीचा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे शेतकरी वळला होता. मात्र, आता दुग्ध व्यवसाय हेच प्रमुख उत्पन्नाचे साधन बनल्याने शेतीला दुय्यम स्थान दिले जात आहे. तालुक्यासह जिल्ह्याच्या व राज्याच्या ग्रामीण भागात ज्या ‘गोविंद’ने दुग्ध व्यवसाय तारला व शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्न केले. अशा गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे नाव जागतिक पातळीवर सर्वदूर पोहोचवण्यासाठी श्रीमंत सत्यजीतराजे यांचे अहोरात्र कष्ट सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणजे हा दुबई दौरा मानला जात आहे.
दरम्यान, जगभरातील सिनेअभिनेते, खेळाडू यांच्यासह संस्थानिक आणि राजघराण्यांना भुरळ घालणाऱ्या हॉटेल अल उस्तादसह विविध ठिकाणी गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे श्रीमंत सत्यजीतराजे यांनी भेटी दिल्या आहेत. फलटणला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी कशाप्रकारे जोडता येईल, यावर श्रीमंत सत्यजीतराजे यांनी सध्या लक्ष केंद्रित केले आहे.