स्थैर्य, फलटण, दि. २६ : गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सची आंतरराष्ट्रीय ब्रँड बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असून श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर यांनी त्याअनुषंगाने प्रयत्न सुरु केलेले आहेत. गल्फ फूड्स २०२१ या आंतरराष्ट्रीय खाद्य पदार्थांच्या प्रदर्शनात सध्या भारतातील फक्त गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचाच बोलबाला पाहायला मिळत आहे.
गल्फ फूड्स २०२१ या आंतरराष्ट्रीय खाद्य पदार्थांच्या प्रदर्शनात सहभागी होण्याचे ‘गोविंद’चे हे तिसरे वर्ष आहे. या प्रदर्शनात भारतातून दुग्ध व्यवसायातील अमूल, मस्काटी, परम, शीतल या दिग्गज ब्रँडच्या अग्रभागी महाराष्ट्रातील एकमेव ‘गोविंद’ हा ब्रँड दिमाखात उभा आहे. दरम्यान, दुबई येथे सुरु असलेल्या या प्रदर्शनात ‘गोविंद’ची माहिती घेण्यासाठी जगभरातील अनेक व्यापाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. जगभरातील बहुतांश व्यापारी सध्या भारतात आपली गुंतवणूक करण्याच्या विचाराधीन आहेत. आगामी काळात ‘गोविंद’च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय गुंतवणूक भारतात एव्हाना फलटण व परिसरात होऊ शकते, असा कयास सध्या लावला जात आहे.
आखाती देशात ३९ सुपरमार्केट्स आणि अमेरिका, कॅनडा, इटली, स्वित्झर्लंड, टांझानिया आदी देशांमध्ये कंपनीचा विस्तार करणारे धनंजय दातार यांनी व्यवसायाच्या दृष्टीने ‘गोविंद’सोबत चर्चा केली. दातार हे ‘अल अदील ट्रेडिंग कार्पोरेशन’च्या माध्यमातून नऊ हजार भारतीय उत्पादने आखाती देशांमध्ये आणि इतरत्र वितरीत करीत आहेत. पिठाच्या आधुनिक गिरण्या व मसाला उत्पादनाचे कारखाने, सुपरमार्केट्स असा त्यांच्या कंपनीचा विस्तार झाला आहे. दुबईच्या राजाने ‘मसाला किंग’ ही मानाची पदवी देखील त्यांना दिली आहे. गेल्या वर्षी ‘फोर्ब्स’च्या यादीतही झळकण्याचा मान त्यांना मिळाला. संयुक्त अरब अमिरातीतील अरेबियन बिझनेसतर्फे सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत त्यांना अठरावे मानांकन मिळाले आहे. हा बहुमान मिळविणारे ते एकमेव महाराष्ट्रीय उद्योजक आहेत. श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर यांनी धनंजय दातार यांची आवर्जून भेट घेतली. आगामी काळात एकत्रितरित्या येत कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जात असताना भारतातल्या विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण भागातल्या तरुणांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने यावेळी विचार विनिमय झाला.
दुबई येथे सुरु असलेल्या गल्फ फूड्स २०२१ या खाद्य प्रदर्शनाचे उदघाटन दुबईचे युवराज शेख हमदान बिन महंमद बिन रशीद अल मखतुम यांनी केले. गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स व कुरोली फूड्सच्या विविध पदार्थांचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी ‘गोविंद’चे श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, ब्रँड आणि कम्युनिकेशन मॅनेजर अक्षय शिंदे, इंटरनॅशनल सेल्स मॅनेजर भरत निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यासाठी संजीव कुलकर्णी, उमेश पाटील, विशाल जगताप, प्रणित कांबळे यांचे सहकार्य मिळत आहे.