भाविकांना सरकारचे दिवाळी गिफ्ट : पाडव्यापासून मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडणार


 

स्थैर्य, मुंबई, दि.१४: राज्यात कोरोना आणि
लॉकडाउनपासून बंद असलेली मंदिरे आणि सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा अखेर
मुहूर्त निघाला आहे. पाडव्यापासून सर्व प्रार्थनास्थळे खुली करणार असल्याची
घोषणा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. परंतु, या दरम्यान
सर्वांना सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियम पाळावे लागतील याची आठवणही यावेळी
मुख्यमंत्र्यांनी करून दिली. मुख्यमंत्री म्हणाले, की हा फक्त सरकारी आदेश
नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो,
पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर
प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व
महाराष्ट्राला मिळतील!

बेसावध राहून चालणार नाही

मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे.
प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली
असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार
नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही.
राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या
तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर
साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त,
सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही.
इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात
शिस्त पाळलीच. याची आठवणही यावेळी उद्धव ठाकरेंनी करून दिली.

स्वतःबरोबर इतरांचेही रक्षण करा

गेल्या
काही दिवसांपासून प्रार्थनास्थळे बंद असली तरीही डॉक्टर्स, परिचारिका,
वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता.
देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह
सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम,
शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष
प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा असे आवाहन
मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

उल्लेखनीय
बाब म्हणजे, या प्रकरणी भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी महाविकास आघाडी
सरकारमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. भाजपने मंदिर आणि प्रार्थनास्थळे
उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले होते. तर याच प्रकरणी राज्यपाल भगत
सिंह कोश्यारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता
फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. तर राज्यपाल आणि
मुख्यमंत्र्यांचा प्रार्थनास्थळांचा वाद चक्क केंद्र सरकारपर्यंत गेला
होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!