स्थैर्य, दुधेबावी : गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षाने नुकतीच विधानपरिषदेत सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यांना भाजपने संधी दिल्याने महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे. पडळकर यांच्या घरात कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी पूर्णवेळ राजकारण करत आज आमदार पदापर्यंत मजल मारली. हे त्यांच्या कष्टाचे त्यांना मिळालेले फळच आहे. मात्र दुसरी बाजू पाहता भाजपनेही धनगर समाजाला नेहमी प्रमाणे योग्य न्याय दिला आहे. त्या तुलनेत पाहता राष्ट्रवादी व काँग्रेसने धनगर समाजाला नेहमीच गंडवण्याची भूमिका घेतली आहे. गत विधानसभा निवडणुकीत भाजपने महादेव जानकर यांना विधान परिषदेत आमदार करून कँबिनेट मंत्री केले होते. तर राम शिंदे यांनाही राज्यमंत्री पद दिले होते. तर राज्यसभेत डॉ. विकास महात्मे यांना संधी दिली होती. तसेच अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर समाजाचा मंत्री असलेल्या राम शिंदे यांच्या मतदार संघात जाऊन रोहित पवार यांना निवडून आणले. धनगर समाजाची भावना लक्षात घेऊन दुसर्या मतदार संघात त्यांनी निवडणूक लढायला पाहिजे होती. या सर्व बाबींचा विचार समाज बांधवांनी समाज म्हणून करायला हवा. धनगर समाज लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्रात दुसर्या क्रमांकावर आहे. मात्र त्या प्रमाणात राजकीय संधी दिली जात नाही. गोपीचंद पडळकर यांनी ती संधी स्वतः निर्माण केली आहे. त्यांची भाषण कला चांगली असल्याने आज त्यांच्या सभेला समाज बांधव मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.
धनगर समाजात आजपर्यंत अनेक आमदार झाले, काही मंत्री झाले मात्र ते जास्त काळ राजकारणात राहू शकले नाहीत किंवा त्यांना राहू दिले नाही. त्यामध्ये गणपतराव देशमुख अपवाद आहेत. तेही शेकाप मध्ये होते म्हणून आणि त्यांनी धनगर समाजाचा मुद्दा धरला नव्हता म्हणून. तसे पाहता माजी मंत्री आण्णा डांगे यांनीही आपल्या कार्यकाळात चांगली कामगिरी केली. धनगर समाजाला इतर पक्ष न्याय देत नाहीत त्यासाठी आपला स्वतः चा पक्ष असावा हा योग्य मुद्दा घेऊन महादेव जानकर पुढे आले होते. मात्र त्यांनाही ते करता आले नाही. आरक्षणाच्या मुद्यावर ठाम न राहता तेही बदलले. मंत्रीपद मिळाल्यानंतर पक्ष वाढला पाहिजे होता, समाजातील लोक जवळ आले पाहिजे होते. मात्र तसे न होता आज उलटे चित्र पहायला मिळत आहे. आज भाजपची सत्ता राहिली नाही. मग जानकरांनी इथून पुढे काय करायचे. आता तर समाज व कार्यकर्ते बरोबर राहिले नाहीत. धनगर समाजाला कायम साथ देणारा व त्यांच्या सोबत राहणारा परमंनन्ट नेता पाहिजे. असा नेता मिळाला तर समाजाचेही भले होईल व त्या नेत्याचेही. एखादे पद मिळालेकी हुरळून जाऊन चुकीचे निर्णय घेतात व समाजाला विसरून जातात व नंतर पेन्शन खात बसतात. गोपीचंद पडळकर हा स्वयंभू नेता आहे. त्यांनी आजपर्यंत आपल्या आक्रमक भूमिकेने सर्व काही मिळवले आहे. हे करत असताना त्यांनी समाजहित पाहिले आहे. आतापर्यंतची त्यांची भूमिका चांगली आहे.
त्यांना भाजपने धनगर समाजाचा विचार करून विधान परिषदेत संधी दिली आहे. योग्य व्यक्तीची निवड केली आहे. गोपीचंद पडळकर तरुण आहेत. त्यांना आगामी काळात काम करण्याची संधी आहे. धनगर समाजालाही त्यांच्या सारखा तडफदार नेता पाहिजे आहे. त्यांनीही या संधींचे सोने केले पाहिजे. भाजपचे गोपीनाथ मुंडे छोट्या समाजाचे होते मात्र त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन केल्यामुळे ते तमाम महाराष्ट्राचे नेते झाले होते. ओबीसीचा नेता म्हणून त्यांची ओळख झाली होती. गोपीचंद पडळकर यांनी भविष्यात गोपीचंद न राहता गोपीनाथ व्हावे ही इच्छा व शुभेच्छा.