एक राजा होता. राजाच्या इच्छेपुढे कोणाचे काही चालत नसे. एके दिवशी त्याला काय इच्छा झाली कुणास ठाऊक पण त्याने दरबारात आज्ञा दिली की मला स्वर्गातील फुलांचा हार गळ्यात घालायला पाहिजे आहे. दरबारातील सारे विचारात पडले की असा हार कसा मिळवायचा. एका विद्वान मुनींनी राजाचे हे आव्हान स्वीकारले आणि राजाला स्वर्गातील हार आणून देण्याचे कबूल केले. काही दिवसानंतर मुनी राजाकडे आले व म्हणाले, “राजन ! मला स्वर्गातील हार तर मिळाला आहे पण हाराबद्दल एक अडचण आहे. ” राजा म्हणाला,” काय आहे ती अडचण.
विद्वान मुनी म्हणाले, “तो स्वर्गातील हार फक्त पुण्यवान लोंकानाच दिसेल पापी लोंकाना हा हार दिसणार नाही. या नंतर मुनींनी राजाच्या गळ्यात हार घालण्याचे नाटक केले व एक दोरी त्याच्या गळ्यात घातली. राजाला कळेना की आपल्या गळ्यात अशी दोरी का घातली आहे. राजा विचारात पडला की आता याला दोरी म्हणावे कि हार ? कारण दोरी म्हणाले तर पापी ठरतो आणि हार म्हणावे तर दोरी गळ्यात घालून फिरावे लागते. तो काहीच बोलला नाही त्याने ते स्वीकार केले व गप्प राहिला. दरबारातील लोकांनीही हाच विचार केला की राजाला जर दोरी घालणे पसंत असेल तर आपण कशाला काही बोलायचे आणि हार नाही म्हंटले तर आपण पापी ठरतो. म्हणून दरबारीही गप्प राहिले.
दोन – तीन दिवसांनी दरबारातील एक अनुभवी सरदार गावावरून परत आला. त्याला या प्रसंगाची काहीच कल्पना नव्हती. त्याने येताक्षणी राजाला विचारले, राजेमहाराज ! आज पर्यंत मी तुम्हाला हिरे माणिक, मोत्यांचे हार घातलेले पहिले आहे. पण आज ही दोरी का गळ्यात अडकवून तुम्ही फिरत आहात. झाले दरबारातील सर्वांनी मोठा गलका केला की जगातील सर्वात मोठा पापी मनुष्य सापडला, याला राजाच्या गळ्यात हार न दिसता दोरी दिसते आहे. राजाला पण राग येवून त्यांनी त्याला तुरुंगात डांबले.
पण राजाला आणि दरबारातील सर्व लोकांना माहित होते की राजाच्या गळ्यात दोरीच आहे. पण सत्य आणि खर सांगण्याचे धाडस, दानत कोणी दाखवली नाही. जो खर सत्य बोलला त्याला राजाची आपली खोटी पुण्यवान असल्याची शान, टिकवण्यासाठीच राजाने सरदाराला शिक्षा देऊन टाकली.
आजच्या काळातही असेच झाले आहे. जो कोणी “सत्य, खर” सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यांचे म्हणणे, आवाज, दाबून टाकला जातो. तरी पण आपण सत्य वाट कितीही बिकट असली तरी त्याची वहिवाट करणे. खऱ्याला मरण नाही. सत्य सूर्यप्रकाश इतके सत्य असते. नेहमी सत्याची कास धरावी. सत्य हेच ईश्वर आहे.