दिल्लीत मान्यवरांच्या हस्ते ‘अजिंक्यतारा’चा गौरव; कारखान्याला इफिशियन्सी पुरस्कार प्रदान; पवार साहेबांकडून कौतुक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.१७ नोव्हेंबर २०२१ । सातारा । नॅशनल फेडरेशन न्यू दिल्ली, या राष्ट्रीय स्तरावरील केंद्रीय शिखर संस्थेकडून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झालेला ‘हायस्ट शुगर रिकव्हरी इन हाय रिकव्हरी एरीया’ इफिशियन्सी पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय सहकार मंत्री ना. बी.एल. वर्मा, राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे- पाटील, आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात अजिंक्यतारा कारखान्याचा गौरव करून शरद पवार यांच्यासह मान्यवरांनी कारखान्याच्या कामकाजाचे कौतुक केले.

दिल्ली येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात अजिंक्यतारा कारखान्याला सन्मानित करण्यात आले. कारखान्याच्या वतीने चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे, संचालक नितीन पाटील, महेंद्र पवार, शेती अधिकारी विलास पाटील, चीफ केमिस्ट सुरेश धायगुडे यांनी पुरस्कारचा स्विकार केला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश साळुंखे- दांडेगावकर, संजय भुसार रेड्डी (उत्तर प्रदेश), राष्ट्रीय साखर संघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईक नवरे आदी मान्यवर उपस्थित होते. नॅशनल फेडरेशनकडून यापूर्वी सन २०१९-२० च्या हंगामाकरीता अजिंक्यतारा कारखान्यास ‘बेस्ट केन डेव्हलपमेंट इन हाय रिकव्हरी एरिया’ पुरस्कार प्राप्त झाला होता. सलग दुसऱ्या वर्षी शिखर संस्थेचा पुरस्कार मिळाल्याने देशाच्या सहकार क्षेत्रात कारखान्याच्या नावलौकिकात भर पडली आहे. आतापर्यंत अजिंक्यतारा कारखान्यास कारखान्याची तांत्रिक गुणवत्ता, कार्यक्षमता व अत्युत्तम उत्पादन क्षमतेच्या आधारे देश व राज्यस्तरावरून एकूण २८ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज आदर्शवत सुरु आहे. कारखान्यास मिळालेल्या या पुरस्कारामध्ये संचालक मंडळ, सभासद, बिगर सभासद, सर्व ऊस पुरवठादार शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कामगार-कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. पुरस्कारामुळे संचालक मंडळाची जबाबदारी वाढते आणि अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा प्राप्त होते. काटकसरीचे धोरण, सभासदाभिमूख पारदर्शक कारभार, उत्कृष्ट व काटेकोर आर्थिक नियोजन आणि सर्वांकडून मिळत असलेले बहुमोल सहकार्य यामुळे कारखाना प्रगतीपथावर नेण्यात यश मिळाले असून तालुक्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब महाराज यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले आहे. त्यांच्या आदर्श विचारसरणीला अनुसरून संचालक मंडळ नेहमीच कार्यरत राहील, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी म्हटले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!