स्थैर्य, फलटण, दि. १९ : गेलं संपूर्ण वर्ष हे अचानक उदभवलेल्या कोरोना ह्या महामारीचा सामना करण्यामध्ये गेलं. गेल्या वर्षात दोन तीन दिवसांची अधिवेशने संपन्न झाली. आता होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुमारे २० दिवसांचे असणार आहे. तरी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्यातील मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांना द्यावी अशी मागणी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेली आहे.
या बाबत बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले कि, कोरोना विषाणूचा प्रसार आगामी काळामध्ये थांबेल कि नाही हे कोणालाही सांगता येणार नाही. मागील संपूर्ण वर्ष हे आपण अचानक आलेल्या कोरोना या महामारीला तोंड देण्यामध्ये घालवलं आहे. विधान सभेचे २८८ आमदार व विधानपरिषदेचे ६० आमदार असे मिळून ३४८ आमदार हे अधिवेशनादरम्यान विधान भवन येथे येत असतात. त्यांच्या समवेत त्यांचे स्वीय सहाय्यक, राज्यातील महत्वाचे अधिकारी व कर्मचारी हे सुद्धा अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. त्या मुळे सर्व मंत्री व आमदारांना कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी माझ्या बरोबर विधान परिषदेच्या उपसभापती सौ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केलेली आहे.
जर का भारत व महाराष्ट्र सरकारने यांनी आमदारांना कोरोनाची लस उपलब्ध करून दिली तर निश्चितच आमदारांचा काम करण्याचा जोर वाढेल व त्या मुळे कोरोना लसीबाबत सुद्धा एक चांगला संदेश जनतेत जाईल असा मला विश्वास आहे, असेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.