स्थैर्य,खंडाळा,दि ६ : येत्या बुधवारी (ता. नऊ) येथील तहसील कार्यालयावर काढण्यात येणारा बहुजन हक्क बचाव मोर्चा यशस्वी करण्यासाठी बहुजन समाजातील नेते, कार्यकर्ते अहोरात्र झटताना दिसत आहे. तालुक्यातील भाटघर ते कोपर्डे व लिंबाचीवाडी ते शिंदेवाडीपर्यंतच्या सर्व गावांत विविध समाजातील बैठका होत आहेत.
पिसाळवाडी (ता. खंडाळा) येथे बहुजन समाजाची हक्क परिषद बुधवार 14 ऑक्टोबर रोजी झाली. त्यात बहुजन समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे व जातनिहाय जणगणना करावी, असे ठराव घेण्यात आले. यानंतर गावोगावी बैठका घेण्यात आल्या. अहिरे येथे 30 ऑक्टोबर रोजी बैठक घेऊन एक समिती गठित करण्यात आली.
अकाली दलाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट, शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा
17 नोव्हेंबर रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव येथे स्मारकास अभिवादन करून जनजागृतीची सुरुवात करण्यात आली. 25 नोव्हेंबर रोजी शिंदेवाडी येथे बहुजन आरक्षण बचाव संवाद बैठक घेण्यात आली. यावेळी समता परिषदेचे बापूसाहेब भुजबळ उपस्थित होते. यानंतर 30 नोव्हेंबर रोजी संवाद बैठक पार पडली. दोन डिसेंबरला तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मराठा आरक्षण द्यावे. मात्र, आमचे आरक्षण अबाधित ठेवावे, या प्रमुख मागणीसाठी नऊ डिसेंबर रोजी पारगाव-खंडाळा बस स्थानक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे बहुजन हक्क समितीने सांगितले.