स्थैर्य , कोळकी दि.१३ : गेली अनेक वर्षे सत्ता असून देखील कोळकीत आजही अनेक ज्वलंत प्रश्न भेडसावत आहेत. रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणावर संकलित कर जमा होऊन देखील ग्रामपंचायतीवर कोट्यावधींचे कर्ज आहे. सत्ताधाऱ्यांना कोळकीत मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयश आले असून कोळकी ग्रामस्थांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम पॅनलच्या उमेदवारांना एकदा संधी द्यावी. आम्ही कोळकी गावाचा कायापालट निश्चितपणे करून दाखवू, असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिले.
कोळकी (ता.फलटण) ग्रामपंचायत निवडणूकीतील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत श्रीराम पॅनेलचे प्रभाग क्रमांक ३ मधून धर्मराज देशपांडे, सौ. प्रियांका हिंगसे, सौ. कोमल जाधव व प्रभाग क्रमांक ४ मधून स्वप्नाली पंडित व गोरख जाधव या उमेदवारांसह इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद साधताना जयकुमार शिंदे बोलत होते.
यावेळी जयकुमार शिंदे पुढे म्हणाले, आजवर कोळकी ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे. तरीदेखील गावात पाणी, स्मशानभूमी, क्रीडांगण, रस्ते, सुसज्ज भाजी मंडई असे अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे कोळकी करांनी आतातरी जागृत होऊन गावाच्या विकासासाठी सत्तांतर करावे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कोळकीला तालुक्यातील आधुनिक विकासाचे नवे मॉडेल बनवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहू. यासाठी सर्व ग्रामस्थांनी श्रीराम पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहनही जयकुमार शिंदे यांनी शेवटी केली.