शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, भंडारा,दि. 13 : अजूनही कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. शेतकऱ्यांची रोवणीची वेळ असून कर्ज मिळाले नाही ही गंभीर बाब आहे. कर्ज वाटपात सहकार क्षेत्राच्या तुलनेत राष्ट्रीकृत बँकांचे उद्दिष्ट फारच कमी आहे. शेतकऱ्यांना याचवेळी पैशाची गरज असते ते मिळणार नाही तर शेतकऱ्यांचा हंगाम कसा होईल. शासनाने राष्ट्रीयकृत बँकेतील कर्ज वाटपाचा निधी सहकारी बँकेकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँकेतील निधी जिल्हा सहकारी बँकेत वळता करुन शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले  यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली धान खरेदी, खरीप हंगाम, पिकविमा व पिक कर्ज वितरण संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सिंचन विभागाने प्रकल्पात जास्तीत जास्त पाण्याचा साठा कसा होईल यावर युद्ध स्तरावर काम करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्षांनी केल्या. अपूर्ण कालव्याच्या कामास गती देऊन भूसंपादनाच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर करुन प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्या, आपसी समझोता करुन जमिनीचे अधिग्रहण करा, असे त्यांनी सांगितले.

अन्न पुरवठा अंतर्गत धान्य वाटपासंदर्भात बोलताना जिल्ह्यातील भटक्या समजातील लोकांना रेशनकार्ड अभावी धान्य मिळत नसल्याने त्यांना राशन कार्ड देऊन मोफत धान्य कसे देता येईल याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिल्या. उपेक्षितांना मोफत धान्य कसे देता येईल यावर धोरण ठरवा. त्याचा पाठपुरावा शासनस्तरावर करता येईल, असे त्यांनी सांगितले.

धान खरेदीचा आढावा घेताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांना धानाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. योजना शेतकऱ्यांसाठी आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनाच झाला पाहिजे व्यापाऱ्यांना नाही. कापूस, तुरीचा मोबदला लकरात  लवकर द्या. बोगस सातबारावर धान खरेदी करणाऱ्यावर तात्काळ एफआयआर नोंदवून गुन्हे दाखल करा, खरेदीवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  हंगामाच्या काळात कोणत्याही शेतकऱ्यास खतांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता कृषि विभागाने घ्यावी, शेतकऱ्यांना विनाखंड 8 तास पुरेशा विद्युत पुरवठा करा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बावनथडी, पेंच, कन्हान, करजखेडा, नेरला, सूरेवाडा, तसेच प्रस्तावित गणेशपूर, धारगाव, कोची पेंच वळण कालवा, कृषी विभाग, विद्युत विभागाचा आढावा त्यांनी घेतला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!