फलटण: गिरीधर सायन्स अकॅडमीचे दहावीत यश – विद्यार्थ्यांची बाजी


फलटणच्या गिरीधर सायन्स अकॅडमीने दहावीत घवघवीत यश मिळवले. श्रेया यादवने ९७.८०% मिळवत बाजी मारली, तर आर्यन शिंदेने गणितात १०० गुण मिळवून नावलौकिक वाढवला.

स्थैर्य, फलटण, दि. 8 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) निकालात फलटण येथील संजीवराजे नगरमधील ‘गिरीधर सायन्स अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम गुणांसह बाजी मारत शहराच्या आणि संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी:

अकॅडमीच्या निकालात विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. यामध्ये श्रेया यादव हिने तब्बल ९७.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच अनुष्का घाडगे हिने ९३.२० टक्के, तन्मय येले याने ९२.०० टक्के आणि अधिराज कुचेकर याने ९०.२० टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे.

गणितात आर्यन शिंदेचे १०० पैकी १०० गुण:

या निकालात गणितातील गुणांनी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. आर्यन शिंदे या विद्यार्थ्याने गणितात १०० पैकी १०० गुण मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. याशिवाय श्रेया यादव हिने गणितात ९९ गुण आणि अनुष्का घाडगे हिने ९८ गुण मिळवत या विषयावर आपले प्रभुत्व सिद्ध केले आहे. या विद्यार्थ्यांची विज्ञान आणि इंग्रजी विषयातील कामगिरीदेखील अत्यंत उत्तम राहिली आहे.

अचूक नियोजन आणि बहुमोल मार्गदर्शन:

विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामागे अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे आणि मयूर भोईटे यांचे अचूक नियोजन व परिश्रम आहेत. तसेच, विद्यार्थ्यांना ‘आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूल’च्या संस्थापिका वैशाली शिंदे यांचे वेळोवेळी बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे फलटण तालुक्यातून कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!