साताऱ्यातील ओझर्डे येथील जवान सोमनाथ अरविंद तांगडे यांच्यावर अंत्यसंस्कार


स्थैर्य, ओझर्डे (ता वाई), दि.१९: ओझर्डे (ता वाई) येथील हुतात्मा जवान सोमनाथ अरविंद तांगडे (वय ३८) यांच्या पार्थिवावर शनिवारी रात्री शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील ,आमदार मकरंद पाटील ,मोहन भोसले ,प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले ,पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे,तहसीलदार रणजीत भोसले, भुईंज पोलीस ठाण्याचे आशिष कांबळे आदींनी हुतात्मा तांगडे यांना श्रद्धांजली वाहिली

तांगडे सिक्कीम येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले. तांगडे हे सिग्नल डिपार्टमेंटमध्ये हवालदार या पदावर कार्यरत होते. सिक्कीममधील कॉलिंग पाँग येथून दहा किलोमीटर दुर एका बर्फाच्या टेकडीवर कर्तव्यावर असताना दि.८ एप्रिल रात्री बर्फाच्या पावसाने झोडपून काढले. त्यात त्यांचा तंबू उडून गेला. रात्रभर तांगडे व त्यांचे साथीदार थंडीत कुडकडले. त्यातच तांगडे यांना चक्कर आल्याने तेथेच पडले अन् गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कॉलिंग पाँग येथील बॅरेकपुर येथील मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून ते कोमात होते.गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

दोनच महिन्यापूर्वी तांगडे हे गावी आले होते. त्यांचे वडिल आजारी होते. त्यांनी त्यांच्या वडिलांवर उपचारासाठी पुणे येथील मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये उपचार करुन केले होते. वडिलांचे दुखद निधन झाले होते. तसेच तांगडे यांची सेवाही संपली होती. परंतु दोन वर्ष वाढवून घेतली होती. त्यांच्या मागे आई, पत्नी व १२ व ८ वर्ष वयाच्या दोन मुली असून त्यांच्या कार्यकाळात अनेक ठिकाणी त्यांनी देशसेवा केली.त्यांना आलेल्या वीरमरणामुळे तांगडे कुटुंबियासह ओझर्डे गावावर शोककळा पसरली होती

त्यांचे पार्थिव सिक्कीमवरुन विमानाने शनिवारी दुपारी पुण्यात आणण्यात आले. रात्री त्यांच्या गावी ओझर्डे येथे पोहोचले. यावेळी त्यांच्या कुटुंबीय आणि व ग्रामस्थांनी अंतिम दर्शन घेतले .त्यावेळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश रात्रीच्या काळोखातही आसमंत भेदून गेला. यावेळी ग्रामस्थांनी अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे अशा घोषणा दिल्या .गावातून सजवलेल्या गाडीतून अंत्ययात्रा काढण्यात आली होती. अंतिम संस्कारासाठी सोनेश्वर येथे कृष्णा नदीतील तीरावर चौथरा सजविला होता .याठिकाणी शासकीय इतमामात सलामी देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत हुतात्मा जवान तांगडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व धार्मिक सोपस्कारानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!