फलटण तालुक्यातील बाधीत शेतकऱ्यांकडून प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना निवेदन


 

स्थैर्य, फलटण दि. २९ : आळंदी-पंढरपूर मोहोळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ (पालखी महामार्ग) जमीन संपादन व नुकसान भरपाई कामकाजात होणाऱ्या दिरंगाईमुळे बाधीत जमीन मालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून कामकाजात सुधारणा करावी अशी विनंती करणारे निवेदन फलटण तालुक्यातील बाधीत शेतकऱ्यांनी आज प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप याना दिले आहे. सुधारणा होऊन न्याय मिळाला नाही तर दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता फरांदवाडी, ता. फलटण येथे रस्ता रोको करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांनी दि. २६ मे २०१५ रोजी या महामार्गाची अधिसूचना काढली, सदर अधिसूचना दि. २५ जानेवारी २०१८ रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

फलटण तालुक्यात २६ गावातील ६४१८ शेतकऱ्यांची १००.३८ हेक्टर जमीन या महामार्गासाठी संपादित करण्यात येणार आहे. त्याशिवाय या क्षेत्रात येणारी राहती घरे, विहीर, बोअरवेल, गोठा, पत्राशेड, झाडे तसेच व्यावसाईकांची हॉटेल, दुकाने व इतर उद्योग व्यवसाय बाधीत होत आहेत त्याची मोजदाद होणे बाकी आहे.

सदर संपादित जमीन नुकसान भरपाई वाटप जानेवारी २०२० मध्ये सुरु करण्यात आले, मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्च ते जून या कालावधीत सदर कामकाज बंद राहिले, त्यानंतर कामकाज सुरु झाले परंतू भारत सरकारने नुकसान भरपाई मंजूर करुनही प्रत्यक्ष बाधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यात शासकीय कामकाजातील दिरंगाईमुळे मंजूर नुकसान भरपाई मिळण्यात येत असलेल्या प्रशासकीय अडचणी दूर कराव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

उप जिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १६ यांचे सातारा येथील कार्यालयामध्ये कायमस्वरुपी पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली असून श्रीमती मंजुषा मिसकर यांची या पदावरुन बदलीनंतर त्यांचे जागी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी कार्यालयामध्ये पूर्णवेळ उपस्थित नसतात, त्यामुळे नुकसान भरपाई वितरण प्रक्रिया थंडावली आहे, ज्या शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या आहेत त्यांची सुनावणी होत नाही, फेर सर्व्हेक्षण व अवॉर्ड प्रसिद्ध होत नाहीत त्यासाठी भूसंपादन अधिकारी क्रमांक १६ या ठिकाणी पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करुन कामकाज गतिमान करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

भूसंपदनाशिवाय सदर क्षेत्रातील राहती घरे, विहीर, बोअरवेल, गोठा किंवा हॉटेल, दुकाने, उद्योग वगैरेंचे नुकसान भरपाईबाबत अवॉर्ड नोटीस संबंधीत शेतकऱ्यांना मिळाली नाही तसेच ज्या संपादित जमिनींमध्ये मालक व कूळ, वाहिवाटदार यांना जमीन संपादन नुकसान भरपाई नोटीस मिळालेल्या नाहीत त्या मिळाव्यात, पूर्वीच्या अवॉर्ड मध्ये एकत्रित नावाचा उल्लेख आहे, त्याऐवजी वैयक्तीक खातेदारानुसार वहीवाटीनुसार जे एम सी चा आधार घेऊन फेर नोटिसा काढण्याची मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे.

वास्तविक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ बाबत चौथा टप्पा धर्मपुरी ते बाळूपाटलाचीवाडी या कामाचे टेंडर/निविदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे मार्फत प्रसिद्ध करण्यात आली असताना अद्याप बाधीत शेतकऱ्यांपैकी ४० % शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देत सदर नुकसान भरपाई तातडीने मिळावी तसेच भूसंपादनाशिवाय अन्य नुकसानीची राहिलेली मोजदाद तातडीने करुन त्याचीही नुकसान भरपाई लवकर मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!