“दिल्लीतून टेक ऑफ ते पुण्यात लँडिंगपर्यंत…”;अजित पवारांनी सांगितला घटनाक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ जून २०२३ । सातारा । मी राष्ट्रीय पातळीवरचा पदाधिकारी नाही. मी राज्य पातळीवर काम करणारा आहे. माझ्याकडे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आहे. अलीकडे मिडिया माझ्या इतकं का प्रेमात पडलाय कळत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजीच्या बातमीचं खंडन केले आहे. १० जूनच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर माध्यमांमध्ये अजित पवारांबद्दल वृत्त झळकले. त्यावर अजित पवारांनी सविस्तर खुलासा केला आहे.

अजित पवार म्हणाले की, राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक ११ वाजता होती. आम्हाला त्या बैठकीचे निमंत्रण १२ चं होते. ती बैठक राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची होती. मी राष्ट्रीय पदाधिकारी नाही. १२ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळी भाषणे आणि एका राज्यात ७ आमदार निवडून आले त्यांचा सत्कार समारंभ, अध्यक्षीय भाषण झाले तोपर्यंत २ वाजले. माझे ४ चे फ्लाईट होते त्यामुळे लवकर उरकून मी विमानतळावर पोहचलो. पण तिथे काही कारणास्तव त्या फ्लाईटला ५.३० पर्यंत विलंब झाला. त्यानंतर मी पुणे एअरपोर्टला उतरलो तेव्हा काही सहकाऱ्यांनी माध्यमांमध्ये झळकणाऱ्या बातम्या सांगितल्या. अजित पवार यांच्यावर कुठलीही जबाबदारी नाही असं माध्यमे चालवत होते. पुण्यात जेव्हा मी पोहचलो तेव्हा मला या गोष्टी कळाल्या. पुणे विमानतळाबाहेर मी माध्यमांना उत्तर दिले असं त्यांनी सांगितले.

मुळात माझ्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आहे. ज्यांचे जास्त आमदार त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असतो. विरोधी पक्षनेतेपदाचे कामकाज मी करतोय. जाणीवपूर्वक माझ्याबाबत अशा बातम्या येत आहेत. बातम्यांचे खंडन करायचे. काय झाले ते सांगायचे त्यातच माझा वेळ जातोय. १५ तारखेला काही सहकारी राष्ट्रवादीत प्रवेश करतायेत त्यासाठी मी धुळ्यात जाणार आहे. त्यानंतर राज्यातील विविध भागात कार्यक्रमात मी सहभागी होतोय, पक्षाची भूमिका मांडतोय. महागाई, बेरोगजगारी आणि शेतकऱ्यांची जी अवस्था आहे त्यांच्याबाबत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न विचारतोय असंही अजित पवारांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मला राष्ट्रीय राजकारणात रस नाही. १९९१ साली मला खासदार म्हणून बारामतीकरांनी निवडून दिले. त्यानंतर मी ६ महिने तिथले चित्र बघितले. माझ्या कामाची पद्धत आणि राष्ट्रीय राजकारणातील कामाची पद्धत यात बराच फरक आहे. त्यामुळे मी तेव्हा ठरवलं होते महाराष्ट्रात काम करायचे. तेव्हापासून आजपर्यंत मी महाराष्ट्रात काम करतोय. सत्तेत असो विरोधी पक्षात राज्यातील जनतेसाठी काम करतोय असं अजित पवारांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!