
स्थैर्य, सातारा, दि. २७: भुमिअभिलेख कार्यालयातून फाळणी नकाशाची नक्कल काढून देण्यासाठी 12 हजारांची लाच मागून 10 हजार स्वीकारताना रंगेहाथ सापडलेल्या लिपिकाला सातारा येथील विशेष न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार दंडाची शिक्षा सुनावली. कृष्णात यशवंत मुळीक असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, कृष्णात यशवंत मुळीक, छाननी लिपिक, कार्यालय, वाई मोजणी खाते, वर्ग 3, हा सातारा येथील भुमिअभिलेख कार्यालयात कार्यरत असताना तक्रारदाराने कोंडवे, ता. सातारा येथील गट नंबर 179चा फाळणी नकाशा काढून देण्यासाठी अर्ज दिला होता. हे काम करून देण्यासाठी मुळीक याने 12 हजार लाचेची मागणी केली. या कामाच्या पुर्ततेसंदर्भात तक्रारदार सातारा कार्यालयात गेले असता मुळीकची वाई येथे बदली झाल्याचे समजले. तक्रारदाराने फोनवरुन संपर्क साधला असता मुळीकने आपल्याकडे अर्ज असून काम करून देणार असल्याचे सांगत वाईला बोलवले. दि. 13 ऑगस्ट 2014 रोजी केलेल्या पडताळणीत 12 हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 10 हजारांची लाचेची मागणी करून दि. 01 सप्टेंबर 2014 रोजी वाई-सातारा रोडवरील आधार हॉस्पिटलसमोर अल्टो (एमएच 11 एके 9978) मध्ये बसून स्विकारताना पकडण्यात आले होते. याप्रकरणी मुळीकविरोधात वाई पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई सातारा अॅन्टी करप्शनचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोनि बयाजी कुरळे यांनी केली.
यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीहरी पाटील यांनी केला होता. याप्रकरणी दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी मा. जिल्हा विशेष न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी आरोपी लोकसेवक कृष्णात मुळीक याला लाचलुचपत अधिनियम 1988 चे कायदा कलम 7 अन्वये दोषी ठरवून 3 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार दंड, दंड न दिलेस 2 महीने सक्त मजुरी तसेच कलम 13 (1) (ड) सह 13 (2) अन्वये 4 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार दंड, दंड न दिलेस 2 महीने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली.
जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी व केसचे कामकाज सहायक सरकारी वकील लक्ष्मण खाडे यांनी सरकारतर्फे कामकाज चालविले. न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी अशोक शिर्के, पोलीस उपअधीक्षक (एसीबी), उपनिरीक्षक विजय काटवटे यांनी मदत केली.