मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या नऊ महिन्यांत पूर्ण होईल – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण


दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२३ । मुंबई । मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी आवश्यक भूसंपादन पूर्ण न झाल्याने कामाला विलंब होत होता. परंतु हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच शासनाची भूमिका आहे. येत्या ९ महिन्यांत या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य आदिती तटकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, महामार्गाचे पनवेल ते कासु व कासु ते इंदापूर हे सुमारे ८४ किमीचे रखडलेले काम युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. भूसंपादन, विविध खात्याची परवानगी मिळवणे, परवानग्या घेऊन कामाला प्रत्यक्ष सुरुवात करणे यासाठी बराच कालावधी उलटून गेला आहे. या कामासाठी वेगवेगळ्या भागात जाऊन तेथील अडचणी प्रत्यक्षात समजून घेऊन जलद गतीने काम करण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे, असेही मंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अमित साटम, सुनील प्रभू, वैभव नाईक यांनी सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!