केंद्र शाळेच्या चौघी विद्यार्थिनींनी वाचविले साळुंकी पक्ष्याच्या पिल्लाचे प्राण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ जुलै २०२४ | फलटण |
निंबळक, ता. फलटण येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या चौघी मैत्रीनींनी घरट्यातून खाली पडलेल्या साळुंकी पक्ष्याच्या पिल्लाला पाणी पाजून सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. या चार लेकींची ही संवेदनशील ‘सहदय’ कृती पिल्लाला जीवदान देणारी ठरली.

निंबळक केंद्र शाळेतील जान्हवी सागर बुधावले, दिव्यांशी संदीप कुंभार, जान्हवी अमित कुंभार (इ.२ री) व गौरी सोमनाथ चव्हाण (इ. ५ वी ) या चार मैत्रिणी मधल्या सुट्टीत शाळेच्या आवारात खेळत असताना त्यांना घरट्यातून खाली पडलेले एक साळुंकी पक्ष्याचे पिल्लू दिसले. ते पिल्लू त्रासलेले, घाबरलेले व थकलेले होते. त्या चौघींनी या पिलाला मदत करायचे ठरवले आणि लगेचच जान्हवी बुधावले हिने स्वतःची पाण्याची बाटली आणली.दिव्यांशी कुंभार, जान्हवी कुंभार यांनी शिताफीने त्या पिलाला पाणी पाजले. पाणी पिल्यावर पिलाला खूप तरतरी आली. तेव्हा गौरी चव्हाण हिने ते पिल्लू आडबाजूला सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले. थोड्याच वेळात पिल्लू एका झुडपात जाऊन बसले. तेव्हा चौघींचा आनंद गगनात मावेनासा झाला.

चौघींची ही पर्यावरणपूरक कृती सर्वांनाच भावली. त्यामुळे छोटेखानी आयोजित पालक सभेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव निंबाळकर, उपसरपंच विकास भोसले यांच्या हस्ते या चौघींचे ‘पर्यावरणाचे शिलेदार’ म्हणून कौतुक केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका उषा माने, सर्व शिक्षक आणि पालक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!