स्थैर्य, सातारा, दि.०६: शहर पोलिसांनी शुक्रवारी सेव्हन स्टार इमारत, गुरुवार परज आणि कोडोली कमानीजवळ सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत रोकड तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी चौघांना अटक केली आहे.
मनिष शर्मा, शरद साळुंखे, अस्लम मुल्ला, विकास काकडे, पांडूरंग शिंदे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, या तीनही जुगार अड्ड्यावरील कारवाईत यासिन शेख याच्यावर तीन गुन्हे दाखल झाले असून तो फरारी झाला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनीच गुन्हे दाखल केले आहेत.
सातारा येथील सेव्हन स्टार इमारतीच्या पाठीमागील आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी पोलिसांनी मनिष राजकिशोर शर्मा (वय 37, रा. सय्यद कॉलनी, करंजे पेठ, सातारा) आणि यासिन इकबाल शेख (रा. शनिवार पेठ, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मनिष शर्मा याला अटक केली असून यासिन शेख फरार झाल्याची माहिती सातारा शहर पोलिसांनी दिली. या कारवाईत पोलिसांनी 950 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.
गुरवार परजावर एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी धाड टाकून दोघांना अटक केली. शरद शामराव साळुंखे (वय 54, रा. साई कॉलनी, शाहूनगर, गोडोली, सातारा), अस्लम ईस्माईल मुल्ला (वय 52, नालबंदवाडा, गुरुवार परज, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 4 मे रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली. दरम्यान, ही कारवाई सुरु असताना यासिन शेख (रा. शनिवार पेठ, सातारा) हा फरार झाला. पोलिसांनी या कारवाईत 1130 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
कोडोली ग्रामपंचायतीच्या कमानीसमोर असलेल्या एका फळाच्या गाड्याच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. याप्रकरणी पोलिसांनी चारजणांवर गुन्हा दाखल केला. विकास रवी काकडे (वय 59, रा. तुकारामनगर, अमरलक्ष्मी, ता. सातारा), पांडूरंग रवींद्र शिंदे (वय 32, रा. लक्ष्मीनगर, कोडोली, सातारा), यासीन इकबाल शेख (रा. 476, शनिवार पेठ, सातारा), सलीम हसन मुलाणी (रा. कोडोली कमानीशेजारी, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापैकी विकास आणि पांडूरंग या दोघांना दि. 4 मे रोजी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.