
दैनिक स्थैर्य | दि. १९ जुलै २०२५ । कोळकी । येथील ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी मंडळी ज्या प्रमाणे गावाच्या कारभारामध्ये खुलेआम भ्रष्टाचार करीत आहेत, ते म्हणजे सत्ताधारी मंडळींनी गेल्या काही दिवसांपासून भ्रष्ट्राचाराचे कुरण बनवले असल्याचे मत माजी सरपंच सौ. रेश्मा संजय देशमुख व माजी उपसरपंच विकास नाळे यांनी प्रसिद्धिपत्रकाच्याद्वारे केलेले आहे.
कोळकी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या मनमानी व भ्रष्टाचाराच्या बाबत माजी सरपंच सौ. रेश्मा संजय देशमुख व माजी उपसरपंच विकास नाळे यांनी प्रसिद्धिपत्रकाच्याद्वारे भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट केली आहे.
कोळकी ग्रामपंचायतीमध्ये सुरु असलेल्या मनमानी व भ्रष्ट्राचाराला कंटाळूनच आम्ही सदस्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. सत्ताधारी राजे गटाच्या गावपुढार्यांनी गावाचा विकास न करता फक्त काही बगलबच्चे मंडळींचाच विकास करण्याचे नवे धोरण आखले असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचे मत सुद्धा प्रसिद्धीपत्रकात विकास नाळे स्पष्ट केले आहे.
गावातील मूलभूत प्रश्नासाठी व जनतेला सुख सुविधा मिळवण्यासाठी आम्ही सातत्याने ग्रामपंचायत मध्ये काही गोष्टींची मागणी करत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी मंडळी जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. गावामध्ये अनेक ठिकाणी अनियमित कामे सुरू असून काही ठिकाणी मुरुमाची गरज नसताना मुरूम टाकला जातो व त्यामध्ये भ्रष्टाचार केला जातो. अनेक चुकीच्या पद्धतीची कामे गावामध्ये सुरू आहेत, असे मत माजी सरपंच सौ. रेश्मा संजय देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
कोळकी ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराबाबत रणजितदादांच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरेंकडे तक्रार करणार
कोळकी ग्रामपंचायतीमध्ये सुरु असलेल्या मनमानी कारभाराच्या व भ्रष्टाचाराच्या बाबत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरेंकडे कोळकी ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी व अधिकाऱ्यांच्या बाबत तक्रार दाखल करणार असल्याचे मत सुद्धा माजी उपसरपंच विकास नाळे यांनी प्रसिद्धिपत्रकाच्याद्वारे केले आहे.