दैनिक स्थैर्य | दि. १३ ऑक्टोबर २०२३ | सातारा |
चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित वडूज (ता. खटाव) या संस्थेच्या पाच फरारी कर्मचार्यांना आर्थिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून १२ लाख ९३ हजार रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे. तब्बल चार वर्षांनंतर या कर्मचार्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
याबाबतची अधिक माहिती अशी, चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित वडूजच्या तत्कालीन संचालक, व्यवस्थापक, शाखाप्रमुख यांनी संगनमताने अपुर्या कागदपत्रांद्वारे गृहतारण कर्जवाटप, बोगस ठेवी, संस्थेच्या नावावर अनावश्यक बँक खाते निबंधकांच्या परवानगीशिवाय उघडून १८ कोटी २८ लाख ९२ हजार ३३४ रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा वडूज पोलीस ठाणे दाखल झाला होता. या आरोपींना चार वर्षानंतर पोलिसांनी जेरबंद करून मोठी कामगिरी पार पाडली आहे. यामध्ये निलेश गजानन जळगावकर (शाखाप्रमुख, राहणार पंतनगर, वडूज), रवींद्र आनंदराव गोडसे (वसुली अधिकारी, राहणार शिवाजीनगर, वडूज), अमित विलास काळे (शाखाप्रमुख, राहणार हिंगणे, तालुका खटाव), भानुदास वसंत काळोखे (शाखाप्रमुख, राहणार काळोखे वस्ती, खातगुण, तालुका खटाव), संतोष मधुकर काळे (कॅशिअर, राहणार हिंगणे, तालुका खटाव) या पाच जणांना ५ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेआठ वाजता अटक करण्यात आली. त्यांना विशेष सत्र न्यायालय वडूज येथे हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या प्रकरणी तपासाच्या अनुषंगाने घरझडती घेतली असता आरोपी काळोखे याच्या घरी चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या लॉकरच्या चाव्या आढळून आल्या. या संदर्भात आरोपीकडे विचारणा केली असता त्याने संबंधित लॉकरमध्ये सोने तारण कर्जातील काही कर्जाचे सोने असल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचनामा करून १२ लाख ९३ रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे. या संस्थेच्या लेखापरीक्षणामध्ये ६ कोटी ७ लाख २४ हजार १३४ रुपयांचा अपहार उघडकीस आला होता. या प्रकरणी एकूण २४ आरोपींपैकी दहा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. उर्वरित आरोपी पोलिसांना हवे असल्याने त्यांच्याविरुद्ध विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने सीआरपीसी ७० प्रमाणे कारवाईची परवानगी दिली आहे.