स्थैर्य, औंध, दि.२२: आर्थिकदृष्ट्या सक्षम लाभार्थी रेशनकार्डधारकांनी स्वतः हून अन्नसुरक्षा अनुदान योजनेतून मिळणाऱ्या धान्याचा लाभ सोडावा असे आवाहन माणचे प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी केले.
औंध येथील यशवंत सुकटे यांच्या स्वस्त धान्य भेटीनंतर ग्राहकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी तालुका पुरवठा अधिकारी श्रीकांत शेंडे पुरवठा निरीक्षक आनंद शिंदे, नितीन सुकटे, सतीश देशमुख, प्रकाश आमले,दिपक कुंभार ,बंडा हिंगे, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुर्यवंशी म्हणाले की, अनेक गरजू रेशनकार्ड धारक आजही रेशनपासून वंचित आहेत. त्यामुळे ज्यांना खरोखरच पीएचएच योजनेची गरज नाही. त्यांनी स्वेच्छेने या योजनेतून स्वताहून बाहेर पडावे.
गरजू व आवश्यक ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी अनेक ग्राहकांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊ अशी ग्वाही प्रांताधिकारी सुर्यवंशी यांना दिली. दरम्यान यावेळी यशवंत सुकटे यांच्या धान्य दुकानाची दप्तर तपासणी करून सर्व रेकॉर्ड व्यवस्थित ठेवल्याबद्दल प्रांताधिकारी सुर्यवंशी यांनी समाधान व्यक्त करून खटाव माण तालुक्यातील धान्य दुकानांची यापुढे नियमित तपासणी करणार असल्याचे सांगून सर्व धान्य दुकानदार ,महसूल विभागातील अधिकारी, पुरवठा शाखेतील अधिकारी यांनी जास्तीत जास्त लक्ष घालून आवश्यक गरजू लाभार्थ्यांना जास्तीत जास्त धान्य मिळण्यासाठी प्रयत्नशील रहावे.