फोर्ब्सच्या सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.११:‘फोर्ब्स’ या नियतकालिकाने २०२० वर्षासाठी तयार केलेल्या जगभरातील १०० सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, एचसीएल कॉर्पोरेशनच्या सीईओ रोशनी नाडर मल्होत्रा, बायोकॉन कंपनीच्या संस्थापक किरण मजुमदार-शॉ यांचा समावेश आहे.

या तिघींचा गेल्या वर्षीच्या यादीतही समावेश होता. यंदाच्या यादीत निर्मला सीतारामन या ४१ व्या क्रमांकावर असून, रोशनी नाडर मल्होत्रा यांनी ५५ वे व किरण मजुमदार-शॉ यांनी ६८ वे स्थान पटकावले आहे. फोर्ब्सच्या यादीत जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल या सर्वोच्च स्थानी आहेत. मर्केल यांनी यादीत प्रथम क्रमांक २००६ सालापासून कायम राखला आहे. त्याला अपवाद २०१० सालाचा होता. त्यावर्षी बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांना हे स्थान देण्यात आले होते. या यादीत युरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्ष ख्रिस्तीन लर्गार्ड या दुस-या क्रमांकावर व अमेरिकेच्या नव्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या तिस-या क्रमांकावर आहेत.

निर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. याआधी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वत:कडे अर्थखाते ठेवले होते. एचसीएलचे संस्थापक शिव नाडर यांची मुलगी रोशनी नाडर मल्होत्रा ही जुलै २०२० पासून त्या कंपनीची सीईओ बनली आहे. बायोकॉनची स्थापना किरण मजुमदार- शॉ यांनी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!