
स्थैर्य, सोलापूर दि. 3 : रुग्णसेवा न देणार्या खासगी दवाखान्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, असे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज खासगी दवाखान्यांना भेट देवून रुग्ण् सेवा देतात की नाही याची पाहणी केली. तसेच रुग्ण् व डॉक्टरांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पालिका आयुक्त पी. शिवशंकर होते.
कोविड-नॉन कोविड रुग्णांची सोय व्हावी, यासाठी खासगी दवाखान्यांना पालकमंत्री भरणे यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. तसेच ज्या दवाखान्यामध्ये अधिसूचित नियामानूसार डॉक्टर , नर्सिग स्टाफ व जिवरक्षक प्रणाली उपलब्ध् नाही अशा दवाखान्यांविरुध्द तातडीने गुन्हा दाखल करु, असे आदेश श्री. भरणे यांनी दिले. या भेटी दरम्यान उपस्थित डॉक्टर, त्यांच्या वेळा व ओपीडी रजिस्टर या बाबत चौकशी केली. हॉस्पिटलच्या अडचणी समजून घेतल्या. काही खासगी दवाखान्यांनी उत्तम काम केल्याबद्वल अभिनंदन ही केले. सर्व खासगी दवाखान्यातील डॉक्टरांचे सहकार्य अपेक्षित असून सोलापूर कोरोना मुक्त् करण्यासाठी सर्व दवाखान्यांची मदत लागणार आहे. त्यामुळे आपण दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास दवाखान्यावर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.
त्यांनी शहरातील जोशी हॉस्पिटल व लॅब , केळकर हॉस्पिटल, मोनार्क हॉस्पिटल, यश क्लीनिक, धांडोरे हॉस्पिटल, उत्कर्ष हॉस्पीटल, सिटी हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, सोलापूर सहकारी रुग्णालय व आश्वनी हॉस्पिटलना भेटी दिल्या.