दोन सशस्त्र गटात धुमश्चक्री; शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये १२ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०८ फेब्रुवारी २०२२ । शिरवळ । खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गावामध्ये डुकराचे पिल्लू नेल्याच्या संशयावरून दोन गटामध्ये लोखंडी कोयता व लाकडी दांडका, वीट व हातोड्याने झालेल्या मारहाणीप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून अल्पवयीन युवकासह दोन्ही गटामधील १२ जणांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला विनयभंगासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधीक माहिती अशी कि, शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गावामध्ये ४२ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून आकाश जाधव, गणेश जाधव हे घरामध्ये जेवण करीत असताना त्याठिकाणी मयूर अशोक जाधव ह्याने घराबाहेर बोलावले. यावेळी त्याठिकाणी विलास श्रीपती माने, प्रकाश अशोक जाधव, मयूर अशोक जाधव, अशोक बाबुराव जाधव, रियाज शेख, विशाल जाधव व एक अल्पवयीन युवक हे त्याठिकाणी लोखंडी कोयता,लोखंडी हातोडी,चाकू, तलवार,दगडी घेऊन आलेले होते. दरम्यान, संबंधितांनी शुभमने डुकराचे पिल्लू का नेले अशी दमदाटी करीत अचानकपणे हल्ला  केला यामध्ये संबंधित महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व टॉप्स खाली पडले. यावेळी विशाल जाधव याने संबंधित महिलेचा विनयभंग केला तर विलास श्रीपती माने यांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून गणेश  जाधव,आकाश जाधव,सोमनाथ नामदेव जाधव, शुभम लालासो जाधव, तानाजी नामदेव जाधव यांनी डुकराचे पिल्लू नेले आमचे काय वाकडे केले असे म्हणून लोखंडी कोयता, लाकडी दांडका, वीट व हातोड्याने विलास माने व प्रकाश जाधव यांना मारहाण करून विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी गणेश जाधव ,आकाश जाधव, सोमनाथ जाधव ,शुभम जाधव, तानाजी जाधव यांच्याविरुद्ध विनयभंगासहित विविध कलमांतर्गत शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून शिरवळ पोलीसांनी दोन्ही गटामधील ११ जणांना अटक करीत पोलीस कोठडी संपल्यानंतर खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास शिरवळ पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई,पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार हे करीत आहे.


Back to top button
Don`t copy text!