युरिया खताच्या टंचाईमुळे शेतकरी हवालदिल


 

स्थैर्य, वावरहिरे  (अनिल अवघडे) : दुष्काळी माण तालुक्यात यंदा वरुणराजाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे करोना विषाणूच्या संकटातही शेतकर्‍यांत समाधानाचे वातावरण आहे. मोठा खर्च करून शेतकर्‍यांनी खरिपाची पेरणी केली आहे. परंतु ऐन वेळेतच पिकांना टाकण्यासाठी खते मिळेनाशी झाल्यामुळे ती मिळविण्यासाठी शेतकर्‍यांना भटकंती करावी लागत आहे.दुकानदारानी युरिया खताची साठेबाजी केली की टंचाई नैसर्गिक आहे, असा प्रश्न ग्राहक प्रबोधन समिती तालुकाध्यक्ष  राजु मुळिक यांनी उपस्थित करत साठेबाजी करणार्‍या दुकानदारावर कडक कारवाई करावी यासंदर्भात माण तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.  तालुक्यातील दुकानांमध्ये युरियासह इतर खतांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. चढ्या दराने खते विकण्यासाठी व्यापारी खतांची साठेबाजी करत असल्याची चर्चा शेतकर्‍यांमध्ये आहे.या संदर्भात नुकतेच कृषिमंत्री दादा भुसे यांनी औरंगाबाद येथे एका दुकानावर स्टिंग ऑपरेशन केले होते. यामध्ये खत असतानाही ते नसल्याचे दुकानदाराकडून सांगण्यात येत होते. या दुकानावर कृषिमंत्र्यांच्या आदेशावरून कृषी अधीक्षकांनी कारवाई केली. माण तालुक्यातही बहुतांश ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली असून कृषी विभागाने याची वेळेत दखल घ्यावी, अन्यथा  तालुका कृषी कार्यालयावरती हासुड मोर्चा आंदोलन  काढण्यात येईल असे ग्राहक प्रबोधन समितीचे माण तालुकाध्यक्ष  राजेंद्र मुळीक यांनी  निवेदनातुन सांगितले.यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे तालुका सचिव एकनाथ वाघमोडे, शंभूराज जाधव, पृथ्वीराज हिरवे, आदित्य जगदाळे उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!