पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार; धनंजय मुंडे यांची माहिती

राज्यात आतापर्यंत १ कोटी ५० लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भरला पीक विमा; मागील २४ तासात ७ लाख २० हजार शेतकऱ्यांची नोंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 31 जुलै 2023 | मुंबई | पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्यसरकारने केंद्रसरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती.

आजपर्यंत राज्यात तब्बल १ कोटी ५० लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील २४ तासात ७ लाख २० हजार शेतकऱ्यांनी आपला विमा अर्ज भरला आहे. मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबीमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यादृष्टीने केंद्रसरकारकडे विनंती करून आता पीकविमा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. तर उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!