महायुतीतील ‘धमाका’! भाजपचे दोन ‘हेवीवेट’ नेते १५ मे रोजी साताऱ्यात; गडकरी-फडणवीस वेगवेगळ्या ‘मांडवात’


 भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन ‘हेवीवेट’ नेते १५ मे रोजी एकाच दिवशी साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र, ते राष्ट्रवादी आणि भाजपच्या दोन स्वतंत्र आणि मोठ्या कार्यक्रमांत उपस्थित राहणार असल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

 स्थैर्य, सातारा, दि. १२ : सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात येत्या १५ मे रोजी मोठा ‘धमाका’ पाहायला मिळणार आहे. भाजपचे दोन ‘हेवीवेट’ आणि मातब्बर नेते एकाच दिवशी साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे, केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री मकरंदआबा पाटील यांच्या व्यासपीठावर असतील, तर त्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते व मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने आयोजित एका वेगळ्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. अशा राजकीय पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीचे सरकार असल्याने या नेत्यांना एकत्र यावे लागत आहे.

भुईंजमध्ये गडकरींचा सत्कार आणि सहकाराची नवीन जुळणी

  • गेल्याच आठवड्यात नितीन गडकरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. भुईंज येथील ‘किसन वीर सहकारी साखर कारखान्या’च्या कार्यस्थळावर ते ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ स्वीकारणार होते.

  • हा कारखाना सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री मकरंदआबा पाटील आणि खासदार नितीनकाका पाटील यांच्या ताब्यात आहे. (भाजप नेते मदनदादा भोसले यांचे मकरंदआबा हे कट्टर राजकीय विरोधक आहेत.)

  • मात्र, पश्चिम बंगालमधील एका राजकीय कार्यक्रमामुळे गडकरींना त्यावेळी येता आले नव्हते. पण आता त्यांनी १५ मे रोजी येण्याचा शब्द दिला आहे.

  • विशेष म्हणजे या व्यासपीठावर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हेही उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या सहकाराच्या ‘मांडवात’ एक नवीन राजकीय जुळणी होताना दिसत आहे.

सैनिक स्कूल मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन?

  • एकीकडे भुईंजमध्ये गडकरी उपस्थित असतील, तर त्याच दिवशी साताऱ्यातील ‘सैनिक स्कूल’च्या मैदानावर केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मोठ्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतील.

  • ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने येथे ‘प्रधानमंत्री आवास योजनेच्या ५ लाख घरांचा लोकार्पण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.

  • मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकतीच सातारा जिल्हा परिषदेची सत्ता खेचून आणली आहे. हा लोकार्पण कार्यक्रम जरी सरकारी असला, तरी मंत्री गोरेंच्या स्वभावानुसार या कार्यक्रमात भाजपची मोठी ताकद दाखवली जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात जोरदार ‘शक्ती प्रदर्शन’ होण्याची चर्चा आहे.

जिल्हावासीयांना उत्सुकता

सहकार आणि ग्रामविकासाच्या दोन वेगवेगळ्या ‘मांडवांत’ भाजपचे दोन्ही मातब्बर नेते एकाच दिवशी उपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकत्याच झालेल्या झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीतील राड्यानंतर स्थानिक महायुतीतच ठिणगी पडली आहे. स्थानिक नेतेमंडळी एकमेकांना भिडली असताना आता १५ मे रोजी या दोन स्वतंत्र कार्यक्रमांत देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी काय बोलणार? याची मोठी उत्सुकता संपूर्ण सातारा जिल्ह्याला लागून राहिली आहे.


Back to top button
Don`t copy text!