स्थैर्य, कोळकी, दि. ०५: एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ६ वर्षाखालील मुलांचे पोषण व आरोग्यस्थिती सुधारणा करणे आणि बालमृत्यू रोखण्यासाठी लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, पुरक पोषण आहार, पंधरा ते पंचेचाळीस वर्षे वयोगटातील महिलांना आरोग्य व पोषण शिक्षण व तीन वर्षे ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पुर्व प्राथमिक शिक्षण (अनौपचारीक शिक्षण) इत्यादी सेवा देण्यात येतात. यासाठी फलटण तालुक्यातील महिला व बाल विकास विभाग व आरोग्य विभागाची यंत्रणा काम उत्कृष्ट रित्या करत आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनी व्यक्त केले.
कोळकी, ता. फलटण येथील ग्रामपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात माता समिती सभा, पोषण आहार प्रदर्शन, आरोग्य मार्गदर्शन व बेबी केअर किट वाटप कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी रणवरे बोलत होते. गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, कोळकीच्या सरपंच सौ. विजया संदिप नाळे, उपसरपंच संजय कामठे, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सागर माने, कोळेकर, इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयसीडीएस कार्यक्रम प्रारंभिक बाल्यावस्थेतील काळजी व विकासासाठी एक वेगळा कार्यक्रम आहे. ज्यामध्ये मागास, ग्रामीण, शहरी व आदिवासी क्षेत्रात राहणार्या ६ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या विकासासाठी व गर्भवती, स्तनदामाता आणि किशोरीसाठी एकत्रित सेवा दिल्या जातात.बालकांची काळजी, शारीरीक व मानसिक विकास तसेच आरोग्य व पोषण यासंबधीच्या गरजा एक दुसर्यावर अवलंबून आहेत. आणि या एकमेकाला पुरक आहेत. या सिध्दांतावर आयसीडीएसचा दृष्टीकोन आधारीत आहे. आयसीडीएस समाजावर आधारीत कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम कार्यान्वित करण्यासाठी समाजातील सदस्य जसे की, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महिला मंडळ, युवा मंडळ, स्वंयसेवी संस्था, शिक्षक इत्यादींचे सक्रिय योगदान देणे गरजेचे आहे. असेही सचिन रणवरे यांनी स्पष्ट केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन पर्यवेक्षिका सौ. शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका सौ. जठार, सौ. डफळ, सौ. नामदास यांनी केलेले होते.