स्थैर्य, फलटण दि. २९ : केंद्र व राज्य शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त शेतकर्यांनी एकत्र येऊन शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी संघ महाराष्ट्र या नावाने संघटनेची स्थापना केली असून राज्यातील सुमारे 1300 पुरस्कार प्राप्त शेतकर्यांना या संघटनेचे सभासद करुन घेण्यात येत आहे.
कोणताही राजकीय हेतू न ठेवता शेती व शेतकर्यांच्या हिताला प्राधान्य देऊन काम करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या संघटनेच्या माध्यमातून शासनाशी संघर्ष न करता शासकीय योजना योग्य प्रकारे राबविणे, योजनेत गरज असेल तर शेतकरी हिताची दुरुस्ती करुन घेणे, शेतकरी हिताच्या नवीन योजना मंजूर करुन घेणे,
नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, शेतकर्यांच्या विविध समस्या शासनस्तरावर पोहोचवून त्याची सोडवणूक होईपर्यंत पाठपुरावा करणे, शेतकर्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करणे आदी प्रमुख उद्दिष्ट संघटना स्थापन करताना निश्चित करण्यात आली आहेत.
त्याशिवाय कृषी विषयक सर्वच शासकीय/अशासकीय समित्यांवर शेतकरी प्रतिनिधी घ्यावेत आणि ते प्रामुख्याने कृषी पुरस्कार प्राप्त शेतकर्यांमधून घेण्याबाबत शासन निर्णय करावा, पुरस्कार प्राप्त शेतकर्यांना कृषी मित्राचा दर्जा देऊन टोल माफी, एस. टी. मोफत प्रवास सवलत मिळावी, समाजातील विविध घटकांना पद्मश्री, पद्मविभूषण यासारखे पुरस्कार शेतकर्यांना दिले जावेत यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येणार आहेत.
संघटनेच्या अध्यक्षपदी कृषिभूषण अड. प्रकाश भुता पाटील धुळे, प्रल्हाद गुलाबराव वरे बारामती-फलटण आणि कृषिभूषण विजय नरवाडे हिंगोली यांची उपाध्यक्षपदी, संदीप नवले पुणे यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे, त्याशिवाय 28 विविध जिल्ह्यातील संचालक, दोन महिला संचालक निवडण्यात आले आहेत.
शासकीय पुरस्कार प्राप्त शासकीय अधिकारी कृषी आयुक्तालय पुणे येथील उप संचालक विनयकुमार आवटे यांना मार्गदर्शक म्हणून संचालक मंडळात घेण्यात आले आहे.