स्थैर्य, कोळकी, दि. १९ : फलटण येथील बारामती चौक येथील उपजिल्हा रुग्णालयातून एका जेष्ठ कोरोना बाधित रुग्णाने पलायन केल्याने मोठी खळबळ उडालेली आहे. दोनच दिवसापुर्वी आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाने कारभार सुधारावा असे फटकारले असतानाच हा गंभीर प्रकार घडल्याने येथील गचाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. या निमित्ताने फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप सदर प्रकारातील दोषींवर कारवाई करणार का ? असा सवाल व्यक्त होत आहे. फलटण शहराचे उपनगर म्हणून ओळख असलेल्या कोळकी येथील मालोजीनगर भागात एका दुकानाच्या कट्ट्यावर संबंधित बाधित व्यक्ती येवून बसली. त्यावेळी तिथे बसलेल्या पत्रकारांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली. त्यांच्या हाताला सलाईनची दिसून आल्याने त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी आपण जिंती ता. फलटण येथील असल्याचे सांगितले. त्याचवेळी कोळकी गणाचे पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे हे तेथे आले व त्यांनी जिंती येथे चौकशी केली असता संबंधित जेष्ठ व्यक्ती जिंती येथीलच असुन सदर व्यक्ति कोरोना बाधित असुन ती फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांना सांगण्यात आले. या नंतर उपस्थित पत्रकारांनी या प्रकाराची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप, पोलिस निरीक्षक भारत किंद्रे व मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना दिली. या नंतर पोलिस तातडीने घटनास्थळी हजर झाले. या नंतर नगरपरिषदेने पाठविलेल्या ॲम्ब्यूलन्समधून त्यांना पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतू तेथे सदर व्यक्तीस आत मध्ये घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले, तेव्हा उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी फोन करताच त्यांना दाखल करुन घेण्यात आले.
कोळकी येथील पोलिस गाडी, ॲम्ब्यूलन्स सायरन वाजवित आल्याने या परिसरात काही काळ नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. परंतू वस्तुस्थिती समजताच उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. दोनच दिवसांपुर्वी कोरोना बाधित रुग्णांची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिला होता. आमदार दीपक चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाने आपला कारभार सुधारावा अशा शब्दात फटकारले होते. त्यानंतर दोनच दिवसात हा गंभीर प्रकार घडल्याने येथील गचाळ कारभार समोर आला आहे. त्यामुळे भविष्यात आणखीन गंभीर घटना घडण्यापुर्वीच लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.